कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पराभवाला कागलमधील घटक पक्ष जबाबदार असल्याचा निष्कर्ष भाजपच्या एका सर्व्हेमध्ये काढण्यात आला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बोट दाखवले गेल्याने यावरून कोल्हापुरातील महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज आणि शिंदे सेनेचे संजय मंडलिक यांच्यात निवडणूक झाली. महायुतीने जोरदार प्रयत्न करूनही मंडलिक हे दीड लाखांहून अधिक मताधिक्याने पराभूत झाले. इतका मोठा पराभव हा महायुतीच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणमिमांसा भाजपने चालवलेली आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणारी विशेष बैठक कोल्हापूर भाजप कार्यालयामध्ये सुरू आहे. लोकसभा मतदारसंघाची विधानसभानिहाय आढावा बैठक चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चंदगड, कागल, करवीर, राधानगरी, उत्तर, दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा विस्तारक यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मकरंद देशपांडे, धनंजय महाडिक, विक्रम पावसकर, महेश जाधव, समरजीतसिंह घाटगे, विजय जाधव, राहुल चिकोडे, राहुल देसाई, नाना कदम, अमल महाडिक, शौमिका महाडिक आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा – कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी घेरा डालो मोर्चा; ११ जिल्ह्यांमध्ये निदर्शने, उपोषण करण्याचा संघर्ष समितीचा निर्णय

सर्वेक्षणात धक्कादायक टिपणी

यामध्ये एका खाजगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे निष्कर्ष नोंदवण्याचे काम सुरू आहे. या सादरीकरणांमध्ये कागल विधानसभा मतदारसंघाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा घटक पक्ष पराभवाला कारणीभूत असणारी धक्कादायक टिपणी सादर करण्यात आली.

हसन मुश्रीफ आरोपाच्या पिंजऱ्यात

कागलमधील घटक पक्ष म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बोट जाते. त्यामुळे या पराभवाला ते जबाबदार आहेत का अशी चर्चा आता भाजपमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा – दरड कोसळल्याने अनुस्कुरा घाटातील वाहतूक विस्कळीत; कोल्हापूर कोकण वाहतुकीवर परिणाम

पालकमंत्री मुश्रिफांचा इन्कार

दरम्यान, या मुद्द्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी याचा इन्कार केला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला घटक पक्ष जबाबदार आहे, असे कसे म्हणता येईल. आम्ही ही निवडणूक हातात घेतली होती, अशी टिपणी त्यांनी केली.