अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये राज्यातील मंत्र्यांनी वरकमाई केल्याचा आरोप करीत सीआयडी चौकशीची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली होती. त्यांचे हे आरोप म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा प्रकार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

राज्यातील पाच कोटी ग्रामीण जनतेला अर्सनिक अल्बम-३० आणि संशमनी वटी या होमिओपॅथिक औषध वाटपाचा प्रारंभ कोल्हापुरातून झाला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. यावेळी हसन मुश्रीफ बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्यांवरून चंद्रकांत पाटील सीआयडी चौकशी लावा म्हणतात. त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर सन २०१४ पासून सगळ्याच बदल्यांची चौकशी करूया, असे विधान केले असून त्यालाही माझा पाठिंबा आहे. आमच्या विरोधी मित्रांना कधी काय करावं याच टाइमटेबल समजेना झाले आहे. त्यामुळेच ते त्रस्त आहेत. लोकशाहीत आंदोलने, चळवळी टिकल्या पाहिजेत. परंतु, विरोधकांनो करोनाच्या काळात बिळात लपून बसू नका, जरा बाहेर या. एकदा पीपीई किट घालून करोना वॉर्डातून जाऊन या,” असा सल्ला त्यांनी दिला.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील असले काय आणि हसन मुश्रीफ असले काय? ते सगळे एकच आहेत. पालकमंत्री म्हणून सतेज पाटील यांचे काम अतिशय उत्कृष्ट सुरू आहे. मी तर त्यांचं मनापासून कौतुक करतो की करोनासारख्या आपत्तीचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी अखंडपणे काम केले आहे, असे म्हणत त्यांनी पाटील यांची पाठराखण केली.