लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील एका कार्यक्रमावेळी अभ्यागतांशी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘आता गडबडीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जायचं आहे,’ असे विधान बोलून गेले. चूक उमगल्यावर शब्द फिरवला खरा; पण त्यामुळे चर्चेचे आवर्तन उठले.
राज्यात मंत्र्यांच्या नावाची नि पाठोपाठ खात्यांची घोषणा होऊन तीन आठवडे उलटले. अजूनही पालकमंत्री कोण याचा गोंधळ सुरूच आहे. अशातच मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याला पालकमंत्री कोण, याचीही चर्चा सुरू आहे. एकीकडे हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर या जिल्ह्यात निवडून आलेल्या दोन्ही मंत्र्यांसह चंद्रकांत पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.
आणखी वाचा-खत खरेदीची सक्ती केल्यास कारवाई – प्रकाश आबिटकर
नागपूर नि कोल्हापूर
एकीकडे नागपूरमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूरचे पालकमंत्री असा उल्लेख केल्यानंतर चर्चा रंगली असताना त्यातच आता मुश्रीफ यांनी असेच विधान केल्याने कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची चर्चा होऊ लागली आहे.