कोल्हापूर : महिलांच्या उन्नतीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वयंसिध्दा या संस्थेच्या प्रमुख कांचनताई परुळेकर यांचे बुधवारी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. गेली काही वर्ष त्याकर्करोगाने आजारी होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. आज दुपारी त्यांचे निधन झाले. ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे विद्यालयात त्यांनी एनसीसी अधिकारी म्हणून काम पाहिले. बी. एड. झाल्यानंतर त्यांनी विषय सोपे, आवडेल अशा पद्धतीने शिकवले. विद्यार्थिनींसाठी कमवा शिकवा योजनेचा पाया त्यांनी तयार केला. श्रमाला प्रतिष्ठा, कष्टाची सवय लागावी यासाठी त्यांनी या क्षेत्रात काम केले.
अध्यापन काळातच त्यांनी विद्यार्थिनींसाठी ‘कमवा शिकावा’ योजनेचा पाया तयार केला. गरीब विद्यार्थिनींना आर्थिक मदत दिली जायची. कांचन ह्यांना वाटले, नुसते पैसे वाटण्यापेक्षा त्यांना जर श्रमाचे पैसे दिले तर ते घेताना त्यांचा स्वाभिमान जागृत होईल. श्रमाला प्रतिष्टा मिळेल. कष्टाची सवय लागेल. या प्रमाणे त्यांनी १६ रु मजुरीवर २ वर्ग रंगवून घेतले. हेच काम त्यांनी १९९२ साली संस्थेच्या स्वरूपात सुरू करून संस्थेला ‘स्वयंसिद्धा’ नाव दिले. स्वयंसिद्धा’ संस्थेच्या कार्याची दखल घेऊन ‘सारडा समान संधी’ हा साडेसात लाख रुपयांचा पुरस्कार कांचनताई परुळेकर यांना मिळाला. कांचनताईंनी ही रक्कम संस्थेच्या कार्यासाठी प्रदान केली. संस्थेच्या कार्याची धुरा आता पुढची पिढी सांभाळत आहे. तृप्ती पुरेकर (स्वयंसिद्धा), जयश्री गायकवाड (स्वयंप्रेरिका), सौम्या तिरोडकर (व्ही.टी.फाऊंडेशन) यांच्यासह अन्य संचालिका सांभाळत आहेत.
स्त्रियांसाठी ‘स्वयंसिद्धा’ हे माहेरघर बनले. नाममात्र मूल्य घेऊन ३० प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. संगणक हाताळणी, विविध हस्तकला, पस्रेस, पाककलेपर्यंतच्या अनेक व्यवसायांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक जाऊन बचत गट संकल्पना आणि उद्योजकीय प्रेरणा यांचे प्रशिक्षणही संस्था देते. संस्थेची अनेक वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प आहेत. मार्गदिपा अंतर्गत, गरीब-गरजू १५० विद्यार्थिनींना दर वर्षी आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्ती, गणवेश व दरमहा मार्गदर्शन दिले जाते. येथे शिकणाऱ्या मुली तीन हजारांपासून तीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात. रेक्झीन पर्सेस, क्रोशा, स्वेटर, ब्युटी कल्चर, स्क्रीन प्रिंटींग, भरतकाम, चालवणे, अभ्यास वर्ग, संस्कार वर्ग, काउंटर सेल्समनशीप, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर प्रेरक कार्यशाळांचे काम अव्याहत सुरू आहे. या कामांसाठी कांचन परुळेकर व संस्थेला विविध अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ‘स्वयंसिद्धा’च्या माध्यमातून ४५०० उद्योजिका घडल्या. ‘लोकसत्ता’ने सप्टेंबर २०१७ मध्ये ‘ लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमांअंतर्गत त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.