कोल्हापूर : पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे यानिमित्ताने निघालेल्या रॅलीमध्ये सहभागी होत त्यांनी स्वतः बुलेट चालवत इतरांना प्रोत्साहित केले.कृषी विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत कुर (ता. भुदरगड) येथे तृणधान्य (मिलेट) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पालकमंत्री आबिटकर यांनी केले. पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट दिली. कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,पॉवर टिलर, रोटावेटरचे वाटप केले.

डॉ. योगेश बन (नाचणी पैदासकार) यांनी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज बनली असल्याचे सांगितले. शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दलचे अनुभव कथन केले. ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील (कोल्हापूर विभाग ), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक (आत्मा ) रक्षा शिंदे उपस्थित होते.महोत्सवाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील व कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ट्रॅक्टर, पॉवर टिलर, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व इ. बाबीचा लाभ मिळणा-या शेतकरी लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले.

तृणधान्य महत्त्व कोणते?

भारत तृणधान्य उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. आशियातील ८० टक्के म्हणजेच सुमारे १७० लाख टन तृणधान्यांचे उत्पादन आपल्या देशात होते. केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर लघु तृणधान्य पिकांची आहारातील उच्च पोषकतत्वे विचारात घेता भारतीय राजपत्रात या पिकांना पौष्टिक तृणधान्य म्हणून घोषित केले आहे. २०१८ हे राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले होते. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज बनली आहे. नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये ही लोह, कॅल्शियम, झिंक,आयोडीन इ. सारख्या पोषक घटकाने समृध्द असून ग्लुटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारित पदार्थांचा वापर दररोजच्या आहारात वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादनातून व मुल्यवर्धनातून कोरडवाहू, आदिवासी भागातील शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याची या क्षमता पिकांमध्ये आहे. तसेच वाढत्या नागरीकरणामुळे समाजामध्ये जीवनशैली विषयक वाढत असलेले आजार नियंत्रण करण्याची क्षमता देखील या पिकांमध्ये आहे.