कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने परिसर चिंब झाला. शिवाय उकडयाने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा दिलासा मिळाला झाड कोसळल्याने कोल्हापुरात एक दुचाकीस्वार जखमी झाला.
चार दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. आजही तसाच अनुभव आला. दख्खनचा राजा जोतिबा देवाची यात्रा गुलालाच्या उधळणीत पार पडते. यात्रा संपल्यानंतर गुलाल धुवून काढण्यासाठी पाऊस धावून येतो, अशी भाविकांची धारणा आहे.
काल पाऊस झाला नसला तरी आज सायंकाळी कोल्हापूर, इचलकरंजी यासह जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. त्याआधी जोराचे वारे वाहू लागले होते. ढगांचं गडगडाट होत पाऊस बरसू लागल्याने काही काळातच अवघे शहर जलमय झाले. १५ मिनिटे ते अर्धा तास पावसाची हजेरी होती. करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर दुचाकी वर झाड कोसळले. जखमी दुचाकी स्वारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.