कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला रविवारी पावसाने झोडपून काढले. पाणीपातळीत वाढ होत असल्याने पंचगंगा नदीचे पाणी या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले असून ४६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायंकाळी कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली असल्याने पूर येण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पश्चिमेकडील भागाला पावसाने झोडपून काढले. पावसाची संततधार सुरु असल्याने लोकांना सुट्टी घरीच घालवावी लागली. काहींनी वर्षा पर्यटन केले असले तरी काही असा ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, चिंब भिजत पंढरीची वारी सुरु राहिली.

हेही वाचा…‘गोकुळ’च्या कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दरात दीड रुपयांची वाढ

रस्ता बंद

कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आज दोन फूट वाढ झाली. काल सायंकाळी ६ वाजता २७. ९ फूट असणारी पाणी पातळी आज याचवेळी २९.७ फूट झाली असून पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. काल ३३ बंधारे पाण्याखाली होते त्यामध्ये २४ तासात आणखी १३ वाढ झाली आहे. चंदगड – हेरे पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद केला असून शासकीय कर्मचारी भर पावसात तेथे थांबून राहिले होते.

तलाव तुडुंब; पर्यटकांना बंदी

वेसरफ व कोदे तलाव (ता. गगनबावडा) पूर्णतः भरले असून सांडव्यावरून अनुक्रमे १२५ व ४०० क्यूसेक्स विसर्ग वाहत असल्याने सरस्वती नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांनां सावधानतेचा इशारा दिला असून हे धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना बंदी केली आहे.

हेही वाचा…विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा; हिंदुत्ववाद्यांची मागणी

घरावर दरड कोसळली

मोहडे (ता. राधानगरी) येथील चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या घराच्या पाठीमागे दरड कोसळली आहे. जीवितहानी झाली नाही. घरात सहा लोक राहतात. या कुटुंबाचे दुसरे एक घर असून तेथे स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain lashes kolhapur district panchganga river overflow psg
Show comments