कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. सलग दुसऱ्या रविवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने लोकांना सुट्टी घरातच घालवावी लागली. जिल्ह्यात पावसाची गती पाहता सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर पकडला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड तालुक्याला पावसाने झोडपून काढले.

शहरातही आज सकाळपासूनच पावसाची संततधार कायम होती. पावसामुळे लोकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. सुट्टीचा दिवस आजही घरातच घालवावा लागला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या २४ तासात ३ फूट वाढ झाली आहे. आज राजाराम बंधारा येथे २० फूट वीस फूट ९ इंच होती. २१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील बर्की रस्त्यावर १ फूट पाणी आले आहे. यामुळे सावधगिरी राखत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा : कोल्हापूर महापालिका हद्दवाढीस विरोध ; १९ गावांत कडकडीत बंद

दरम्यान,कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पाणी पातळी वाढत आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासात जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.