कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होत आहे. पूर्वेकडील भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सुमारे दोन फूट वाढली आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता २३ फूट १० इंच होती. काल रात्री अकरा वाजता ती २१ फूट इतकी होती. जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्राला पावसाने झोडपून काढले आहे. शाहूवाडी , गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड हे तालुके पावसाने जलमय झाले आहेत. राधानगरी धरणातुन ११०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ बनण्यासाठी महिलांची धावपळ; कागदपत्रे मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात गर्दी

शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर लघु पाटबंधारे तलाव हा नंबर पूर्णतः भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने शाळी नदीकडच्या ग्रामस्थांनी नदीकाठी जाण्याचे टाळावे, असे आवाहन वारणा पाटबंधारे उपविभागाने बुधवारी केले आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ७४.४ मिमी पावसाची नोंद झाली. पन्हाळा- ६३,७ मिमी, राधानगरी- ३१.८ मिमी, गगनबावडा- ४८.४ मिमी, भुदरगड- ३५.७ मिमी, आजरा- ३४.५ मिमी, चंदगड- ५८ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.