समाजसुधारणेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने (ता. शिरोळ) विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यासोबत महिलांबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाला मूठमाती देण्याचा निर्णय झाला आहे. याच्या अंमलबजावणीसही सुरुवात झाली आहे. यासाठी ग्रामस्थ, विशेषत: महिलांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे.
हेरवाड हे शिरोळ तालुक्यातील एक छोटेसे गाव. कायम आधुनिक विचारांची कास या गावाने धरली आहे. त्यामुळेच विधवा महिलांबाबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, भेदभावाची परंपरा थांबवण्याचा विचार पुढे आला. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पदाधिकाऱ्यांनी याबाबत चर्चा केली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या एका बैठकीत गावाने महिलांमध्ये भेदभाव करणाऱ्या या प्रथेला मूठमाती देण्याचे ठरवले.
विधवा महिलेचे कुंकू पुसणे, बांगडय़ा फोडणे आदी प्रथा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळोगावाचे कौतुक होत आहे. या महिलांना सर्व प्रकारच्या धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून मानाचे स्थान देण्यात येणार आहे.
चर्मकार समाजाचा पुढाकार : हेरवाड गावाने घेतलेल्या या निर्णयास प्रतिसाद देत गावातील चर्मकार समाज सर्वप्रथम पुढे आला. या समाजाने बैठक घेत यापुढे विधवा पद्धतीला मूठमाती देत सर्वच महिलांना समान पद्धतीने वागवण्याचा निर्णय घेतला आहे. या समाजातील विष्णू गायकवाड (वय ६०) यांचे नुकतेच निधन झाले. यानंतर गावातील सर्व पदाधिकारी त्यांच्या घरी जात कुटुंबीयांचे प्रबोधन करत गायकवाड यांच्या पत्नी तुळसाबाई यांनी यापुढे पूर्वीसारखेच आयुष्य जगू देण्याची विनंती केली. यावर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी यास पािठबा दिल्याने निर्णय घेत या प्रथेविरुद्धचे पहिले पाऊल हेरवाड गावात पडले.
आमच्या गावाने सुरुवातीपासूनच आधुनिक विचारांची कास धरली आहे. या अंतर्गतच विधवा महिलांबाबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, भेदभावाची परंपरा थांबवण्याचा विचार पुढे आला.
– सुरगोंडा पाटील, सरपंच हेरवाड