कोल्हापूर : सकल हिंदू समाजाच्या वतीने येथे रविवारी ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘हिंदू आक्रोश’ मोर्चा निघाला. मोर्चाच्या परिसराला भगवे वातावरण तयार झाले होते. तरुण, तरुणी, महिला यांच्यासह हिंदूत्ववादी संघटना मोर्चात सहभागी झाले होते.
गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मातरविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी तसेच हिंदू धर्मीयांवरील अन्याय, अत्याचारविरोधात येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर, म. फुले यांच्या पुतळय़ाचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. प्रारंभी मैदानी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.
परिसराला भगवे स्वरूप..
ऐतिहासिक बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जुना देवल क्लब, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने निघाला. भगवे कपडे, टोपी परिधान केलेले पुरुष, भगव्या साडय़ा परिधान केलेल्या महिला, मावळय़ांच्या वेशभूषेतील तरुण कार्यकर्ते, हातात भगवे झेंडे यामुळे मोर्चाच्या परिसराला भगवे स्वरूप प्राप्त झाले होते. दुर्गा मातेच्या वेशभूषेतील युवती लक्ष वेधून घेत होत्या. विविध ठिकाणी खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या तसेच अष्टगंध याचे वाटप केले जात होते.
उत्साह अखेपर्यंत कायम.. मोर्चामध्ये खासदार धनंजय महाडिक, सुदर्शन वाहिनीचे संस्थापक सुरेश चव्हाणके, माजी आमदार राजेश क्षीरसागर, ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजपचे प्रदेश सदस्य महेश जाधव, वकील सुधीर जोशी वंदुरकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, शिवानंद स्वामी, बंडा साळुंखे, महेश उरसाल यांच्यासह हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.