कोल्हापूर : करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरात पूर्ण पोशाखात येण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या आहेत. त्यांनी महालक्ष्मी मंदिरात तोकडय़ा कपडय़ांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी आल्यास त्यांना देवीचे दर्शन घेता येणार नाही, असा स्तुत्य निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला असल्याचे बुधवारी म्हटले आहे.
ही मागणी हिंदुत्ववाद्यांनी दीर्घकाळापूर्वीच केली होती आणि हा निर्णय या अगोदरच होणे अपेक्षित होते. हिंदूंच्या भावनांचा विचार करता देवस्थान समितीने घेतलेला निर्णय योग्य असून, समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी त्याविषयी देवस्थान समितीचे अभिनंदन केले आहे.
हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी तृप्ती देसाई आणि काही धर्मद्रोही संघटना, राजकीय पक्ष कपडय़ांविषयीच्या निर्णयावर अकारण टीका करत आहेत. मंदिर ही काही वेडेवाकडे किंवा तोकडे कपडे घालून फिरण्याची जागा नाही. इथे अन्य भाविक मोठय़ा श्रद्धेने येत असतात. या भाविकांच्या मनात महालक्ष्मीबद्दल शक्तिदेवतेचे स्थान आहे. या पाश्र्वभूमीवर असे कपडे घालून येणे किंवा देवीच्या किंवा मंदिराच्या पाश्र्वभूमीवर वेडेवाकडे हावभाव करत छायाचित्रे काढणे हे चुकीचे आहे.
यातून इथे येणाऱ्या भाविकांचा तसेच समस्त करवीरवासीयांच्या भावनांचा अवमान करण्याचा हेतू दिसून येतो. देवस्थान समितीने आता या अशा प्रकारांना मज्जाव घालण्याचा चांगला निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया या संघटनांकडून तसेच इथे येणाऱ्या भाविकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निर्णयाला विरोध करणाऱ्या तृप्ती देसाई यांच्यावर आज अनेकांनी टीका केली. यापूर्वी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी देसाई यांना भाविकांच्या तीव्र विरोधाला सामारे जावे लागले होते. त्यांच्या अकारण ‘स्टंटबाजी’मुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानेही लक्ष देणे आवश्यक आहे. तरी या वेळीही धार्मिक परंपरांच्या रक्षणासाठी हिंदुत्ववादी संघटना, तसेच पक्ष समर्थ आहेत, असा इशारा समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. हिंदू एकता आंदोलनचे चंद्रकांत बराले, शिवसेनेचे संभाजी भोकरे, हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, विहिंपचे मनोहर सोरप, बजरंग दलाचे संभाजी साळुंखे, महेश उरसाल आदींनी समर्थन केले आहे.