देशात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असले, तरी हिंदूंना न्याय येथे मिळत नाही, अशी खंत सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कितीही विरोध झाला तरी पुरोगामीचा बुरखा फाडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असे सांगतानाच त्यांनी सनातन संस्थेला शंभरहून अधिक संघटनांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला .
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकत्रे यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऋषीमुनी आणि संत यांनी धर्मशास्त्राद्वारे जो मार्ग दाखविला, त्या हिंदू धर्माचे शिक्षण देणाऱ्या सनातन संस्थेच्या समीर गायकवाड, डॉ वीरेंद्रसिंह तावडे या साधकांना केवळ नास्तिकवादी आणि पुरोगामी संघटना यांनी मागणी केल्यामुळेच पोलिसांनी अटक केली आहे. कॉ. पानसरे हत्येचा तपास करणारे एसआयटीचे पोलीस बोलका पोपट असून या प्रकरणात पोलिसांकडे ठोस असे पुरावे नसल्याने पोलीस केस चार्ज करायला कचरत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सनातनचे साधक हिंदुत्वांचे विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी अनेक ठिकाणी काम करतात. मात्र त्यांना पुरोगामीचा विरोध होत आहे. आताचे सरकारसुद्धा त्यांना घबरत असल्याने हिंदूंना योग्य न्याय मिळत नाही. कितीही विरोध झाला तरी पुरोगामीचा बुरखा फाडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असेही ते म्हणाले. सनातन संस्थेला शंभरहून अधिक संघटनांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी वीरेंद्र इचलकरंजीकर, मनोज खाडे आदी उपस्थित होते.

Story img Loader