शासनाकडून एकीकडे जलसंवर्धनाच्या कामाची जाहिरातबाजी केली जात असताना दुसरीकडे ऐतिहासिक तलाव बुजविण्याचे काम सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केर्ली (ता. करवीर) येथील शाहूकालीन मोती तलाव बुजविण्याचे काम सुरू असल्याची तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी व तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांच्याकडे केली आहे. त्यावर तहसीलदारांनी बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांना आठ दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी नोटीस बजावली आहे. मोती तलाव बुजविण्याचे काम सुरू असताना अनेक चुकीच्या बाबी घडल्याचे प्रजासत्ताक सामाजिक संस्थेला आढळले. त्यांनी तक्रार केल्यावर निगवे दुमालाचे मंडल अधिकारी यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला. यामध्ये केर्ली गावातील गट क्रमांक ३५१ मध्ये पुरातन मोती तलाव असून तो अंदाजे २० एकरांमध्ये आहे. या तलावाची भिंत ही पश्चिम बाजूस असून तलावाच्या भिंतीच्या पूर्वेस तलावातील पाणीसाठा आहे. सध्या या तलावातील पाणी पूर्णपणे आटले असून त्यामधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मोती तलावामध्ये पारस ओसवाल यांचा मालकी हिस्सा आहे. तलावाची भिंत ही पश्चिम बाजूस येत असून भिंतीच्या दक्षिण बाजूस तलावाचे पाणी सोडणारी विहीर आहे. दक्षिण बाजूस अंदाजे चार फूट मापाचा दगड, माती, मुरुम टाकून भराव टाकला आहे. हा भराव पूर्णत: दक्षिण बाजूस तलावामध्ये असल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी भराव टाकला आहे त्याच्या दक्षिण बाजूस विनापरवाना उत्खनन करून मुरमाचा साठा केला आहे. हा साठा व भराव हा पूर्णपणे तलावाच्या जलसाठय़ामध्ये येत असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.
तलावातील पाणी सोडण्याची शाहूकालीन विहीर फोडून ती नष्ट केले आहे. तलावात येणारे नसíगक नाले बुजविल्याचे दिसत आहे. तलावातील उत्खनन व तलावात टाकलेला भराव कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीरपणे करण्यात आलेला आहे, असे पंचनाम्यात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा