कोल्हापूर : भरधाव मोटारीने धडक दिल्याने मोटार चालकासह तिघांचा मृत्यू झाला. येथील सायबर चौकात हा भीषण अपघात सोमवारी दुपारी घडला. मोटार चालक शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एम. चव्हाण यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्यासह अपघातामध्ये हर्षद सचिन पाटील (वय १६ राहणार दौलत नगर), अनिकेत चौगुले ( वय २४,रा. आसुर्ले पोर्ले ) अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील शिवाजी विद्यापीठाजवळ असलेला सायबर चौक हा वर्दळीचा भाग आहे. आज दुपारी या चौकातून भरधाव वेगाने निघालेल्या मोटारीने चौकाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला सुमारे ५० मीटरच्या अंतरामध्ये चार वाहनांना उडवले. मोटारीच्या वेगाने रस्त्याकडेला लावलेले लोखंडी संरक्षण कठडे मोडून पडले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चार दुचाकी वाहनावरून आठ जण प्रवास करीत होते. ते सर्वजण मोटारीच्या धडकेमुळे पाल्या पाचोळ्यासारखे उडाले. या घटनेने पाहणाऱ्यांचा थरकाप उडालेला होता. काही क्षण काय करावे हेच समजत नव्हते. अपघाताचे भीषण स्वरूप लक्षात आल्यानंतर मदतीसाठी अनेक जण धावले. त्यांनी जखमी मोटार चालक तसेच अन्य जखमींना वाहनातून तातडीने रुग्णालयात हलवले.

पाटील बंधूंना प्रारंभी खाजगी सिटी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्यांच्या सर्वच नऊ जणांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मोटार चालक चव्हाण यांच्यासह तिघांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय प्रथमेश सचिन पाटील, धनाजी शंकर कोळी व शुभांगी शंकर कोळी हे उभयता ,जयराज संतोष पाटील, मयूर मारुती खोत, आणि लहान मुलगा समर्थ पंकज पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शैक्षणिक क्षेत्राला धक्का

दरम्यान या अपघातामध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एम. चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाल्याने शैक्षणिक क्षेत्राला धक्का बसला. त्यांनी प्रभारी कुलगुरू, प्र – कुलगुरू पदावर कामकाज केले आहे. ते दीड वर्ष प्राचार्य होते. भारती विद्यापीठांमध्ये संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सुमारे डझनभर अधिक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांना नवी दिल्लीच्या नॅशनल स्टडीज प्रमोशन इन्स्टिट्यूटचा मॅनेजमेंट एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार मिळालेला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hit and run in kolhapur too eight people hit by the speeding car ssb
Show comments