कोल्हापूर : सन २००५, २०१९ आणि आताचा महापूर याची उच्चतम पातळी निश्चित केली जाईल. पुराचा धोका टाळण्यासाठी त्यापेक्षा उंच पातळीवर बांधकाम करून राहायला जावे लागेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे मंगळवारी व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्ह्यतील महापूर परिस्थितीची पाहणी करून पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना नियोजनाची दिशा स्पष्ट केली. कोकणासह राज्यात मोठय़ा प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करणार आहोत,असे ते म्हणाले.

पूर्वीच्या शासनाच्या अहवालात अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे दिसले नाही. तरीही, महापुरास कर्नाटकातील अलमट्टी धरण कारणीभूत आहे का हेही  पाहणार आहोत,असा उल्लेख करून पवार म्हणाले, महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात धरण पाणी पातळी योग्य  ठेवली जात आहे. यामुळे पुराची तीव्रता जाणवली नाही. महापुराचे पाणी ओसरेल त्यानुसार पंचनामे करण्यात येऊन नुकसान भरपाई कशी करायची ते ठरवणार आहोत.

अतिक्रमणांवर कारवाई

कोल्हापूरसह अनेक नगरपालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झाली असून त्यावर कारवाई करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. अतिवृष्टीबाबत ते म्हणाले, बरेच जण हे संकट जागतिक तापमान वाढीमुळे आले असे म्हणतात. काही भागात आजही पाऊस नाही, पण बऱ्याच भागांत खूप पाऊस पडला. काही ठिकाणी ४ दिवसांत ४०० मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. नदी पात्रालगतच्या अतिक्रमित बांधकामांमुळे हे झाले असे काहींचे मत आहे. त्यामुळे अतिक्रमण देखील हटवण्याचे पाऊल उचलले जाणार आहे. यात चालढकल करणाऱ्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

Story img Loader