महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना गुंडगिरीचे भयावह स्वरूप उघड होऊ लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी गुंड प्रवृत्तीचा आश्रय घेतल्याने पुरोगामी, विचारसरणी, सुधारणावादी म्हणवल्या जाणाऱ्या करवीरनगरीला काळिमा फासला जात आहे. निवडणुकीच्या िरगणातील आजी, माजी, भावी नगरसेवकांचे चेहरे पाहता पालिकेच्या नव्या सभागृहाचा आखाडा होण्याची शक्यता आहे. बहुतांशी उमेदवारांच्या कामगिरीवर नजर टाकता पालिकेत नव्याने अर्थपूर्ण व्यवहारांना उधाण येऊन नगरीच्या विकासाची संकल्पना बासनात गुंडाळून ठेवावी लागण्याची भीती आहे. गुंड-फुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकांच्या लीला पाहून नगरवासीयांना कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ येणार आहे.
आमचा पक्ष स्वच्छ प्रतिमेचा-चारित्र्याचा असा दावा निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात उतरलेल्या राजकीय पक्षांनी सुरुवातीपासूनच चालविला आहे. या पक्षांनी िरगणात उतरवलेले उमेदवार पाहता अनेकांची टगेगिरी नगरवासीयांना चांगलीच माहिती आहे. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरील माहितीवर नजर टाकली की त्यांच्या कृष्णलीला पाहून अवाक व्हावेसे वाटते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजू लाटकर व ताराराणी आघाडीचे उमेदवार सत्यजित कदम (विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार) यांनी व त्यांच्या समर्थकांनी सदर बाजार परिसरात जी धुमश्चक्री केली ती पाहून तेथील नागरिकांचा थरकाप उडाला होता. भरदिवसा ५ तासांहून अधिक काळ सशस्त्र हल्ला-प्रतिहल्ला सुरू राहिल्याचा प्रकार संतापजनक होता. लाटकर-कदम यांच्यात उघडपणे रणकंदन माजले असले, तरी तशा संघर्षांच्या लघुआवृत्ती शहरातील अनेक प्रभागांमध्ये निवडणूक काळात पाहायला मिळत आहेत. याच्या खोलात गेल्यानंतर जी माहिती पुढे येते ती विचारशील व्यक्तीला हादरवून टाकणारी आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा बुरखा पांघरून निवडणुकीच्या िरगणात बरेच गुंड-फुंड उतरले आहेत. मटका किंग, दारू विक्रेते, खंडणीखोर, हद्दपार, बुकी यांना उमेदवारी दिलेली आहे. एका तऱ्हेने कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांनी गुंड प्रवृत्तीला पोसलेले आहे. साहजिकच असे उमेदवार व त्यांच्या समर्थकांना निवडून येण्यासाठी साम कमी आणि दाम, दंड, भेद या नीतीचाच अधिक प्रमाणात अवलंब करावा लागत आहे. त्यातूनच प्रतिस्पर्धी व त्याच्या उमेदवारांच्या माना मुरगुळून ऐन-केन प्रकारे निवडून येण्याचा खटाटोप सुरू असून त्याला राजकीय पक्षांचे आणि स्वच्छ चारित्र्याचा दावा करणाऱ्या नेत्यांचे पाठबळ मिळाले आहे.
महापालिका निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. या घनघोर संघर्षांतून कोण बाजी मारणार, याचा साधारण अंदाज येत आहे. जी नावे नगरसेवक म्हणून पुढे येतात त्यांचा इतिहास, कामगिरी पाहिली की करवीर नगरीच्या सर्वागीण विकासाच्या संकल्पनेला मूठमाती द्यावी लागणार, याची भीती सुज्ञ मतदारांना जाणवू लागली आहे. महापालिकेतील प्रत्येक व्यवहारात अर्थ शोधण्यात वाकबगार असलेल्या या संभाव्य नगरसेवकांना नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल कशी करावी याचे जुजबी स्वरूपाचे ज्ञानही नाही. अशा स्थितीत स्मार्ट सिटीसारखी भव्य संकल्पना प्रत्यक्षात आणणे हे या भावी नगरसेवकांच्या कुवतीबाहेरचे आहे. केंद्र-राज्य शासनाने आधुनिक युगाला साजेशा नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कितीही नव्या योजना आणल्या, तरी त्याचे मातेरे होण्यास वेळ लागणार नाही. ही सारी स्थिती पाहता सत्तेवर कोणीही आले तरी पालिकेच्या विकासाचा इतिहास मागील पानावरून पुढे असाच रडत-खडत सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader