सराफांच्या बंदमुळे जिल्ह्यात १०० कोटींचा फटका बसला असून अबकारी कर मागे घ्यावा यासाठी रविवारी सांगलीत कँडलमार्च काढण्यात आला. केंद्र शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सुवर्णकार आणि सराफ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे उपाध्यक्ष किशोर पंडित यांनी दिली. दरम्यान, सराफांच्या मागणीबाबत आपण गुरूवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींशी चर्चा करणार असल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी विटा येथे सराफ असोसिएशनशी बोलताना सांगितले. शनिवारी विटा येथे गलाई व्यावसायिकांनी बंद पाळून अबकारी कर मागे घेण्याची मागणी केली. याबाबतचे निवेदन खा. पाटील यांना दिले.
केंद्र सरकारने सोने व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू केला आहे. तशी तरतूद अर्थसंकल्पात केली असून याच्या निषेधार्थ गेले १३ दिवस सुवर्ण व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सर्व ठिकाणची सराफी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली असून याचा परिणाम सुवर्णकारागीरांवरही झाला आहे.
आपल्या मागणीसाठी आज सराफ व्यावसायिकांनी सांगलीत कँडलमार्च आयोजित केला होता. यामध्ये सांगलीतील सराफ व्यावसायिकांसह कारागीरही सहभागी झाले होते. सराफी पेठ व गणपती पेठ येथे हा मार्च काढण्यात आला. तसेच मंगळवार दि. १५ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व सराफ व्यावसायिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून या मोर्चाचा प्रारंभ गणपती मंदिरापासून करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर पंडित यांनी सांगितले.

Story img Loader