इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’च्या रकमेतून प्रतिटन १४७ रुपये कपात करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी साखर सहसंचालकांच्या दारात लाक्षणिक उपोषण केले. त्यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने त्यांची बोलती बंद झाली. याबाबत शेतकऱ्यांना ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे म्हणत त्यांनी उद्याही ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील राजारामबापू साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या बिलातून प्रतिटन १४७ रुपयांची कपात सुरू केली आहे. एफआरपीची रक्कम एकरकमी देणे बंधनकारक असताना आणि कोणत्याही प्रकारची कपात करण्यास मज्जाव असतानाही कारखान्याच्या कपातीच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
कपातीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा ऊस नेला जात नसल्याची तक्रार आठ शेतकऱ्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली होती. परंतु त्यांनीही तक्रारीची दखल न घेतल्याने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी केली. अखेर तासाभरातच संबंधित कारखान्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी एन. डी. पाटील यांना दिले. मात्र याची कारवाई न झाल्यास आंदोलन उद्याही सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा