कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मी कायम आहे. माझा प्रचार सुरूच आहे, अशा शब्दात गोकुळ दूध संघाचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार शुक्रवारी बोलून दाखवला.
कोल्हापूरमध्ये मविआकडून डॉ. चेतन नरके, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. त्यासाठी वरिष्ठांच्या गाठीभेटी सुरू होत्या. मात्र गेले महिनाभरापासून शाहू महाराज यांचे नाव पुढे आले आणि काल अधिकृतरित्या त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यामुळे इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. तथापि नरके यांनी मात्र निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.
याबाबत डॉ. नरके म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे रिंगण मी सोडलेले नाही. अजूनही माझा प्रचार संपर्क सुरूच आहे. आज भुदरगड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी
हेही वाचा – बच्चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?
हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीचे होणार आहे. विजयी उमेदवाराला ५० ते ८० हजारांचे मताधिक्य मिळू शकते. मी अपक्ष म्हणून निवडणूक उतरलो तरी एक ते दीड लाख मते मिळवू शकतो असा विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीतील माझी भूमिका निर्णायक ठरणार आहे. ती महायुती वा आघाडी अशा कोणालाही अडचणीची ठरू शकते. त्यामुळे मी माझा प्रचार सुरूच ठेवला आहे. कोल्हापुरात स्वतंत्र पथक प्रचार करीत आहे. समाजमाध्यमावरूनही प्रचार सुरू आहे, असे नरके यांनी स्पष्ट केले.