कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेने आज दुसर्‍यादिवशीही अतिक्रमणा विरोधात पोलीस बंदोबस्तात धडक मोहिम राबवली. या मोहिमेत जेसीबीच्या सहाय्यानं दुकानांसमोरील कट्टे उद्धवस्त करण्यात आले तर फलक, छपरीसाठीचे लोखंडी अँगल कटरनं कापून काढत हातगाडे, फलक जप्त करण्यात आले. दरम्यान मुख्यमार्गावरील महापालिकेच्या शाळा क्र. दोन जवळ या मोहिमेला विरोध केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील मुख्य मार्गासह सर्वच रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यानं वाहतुकीला अडथळा होत आहे. वाहतुक कोंडीमुळं अनेकवेळा अपघातही होत असल्याच्या तक्रारी वाढल्यात. त्यामुळं महापालिकेनं गुरुवारपासून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मुलनाची धडक मोहिम सुरु केली आहे. आज या मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी महात्मा गांधी पुतळा, धान्य ओळ, स्टेशन रोड, राजर्षी शाहु पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं. महापालिकेच्या शाळा क्र. दोन जवळ या मोहिमेला काही दुकानदारांनी वाद घालत विरोध केला. यावेळी अतिक्रमण काढून देणार नाही अशी भूमिका घेत रस्त्यावर अडवं झोपण्याचा प्रकारही घडला. यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर प्रशासनानं दोघांना ताब्यात घेऊन अतिक्रमण हटवण्याची मोहिम सुरुच ठेवली.

हेही वाचा : शंभूराजे देसाई, हसन मुश्रीफ यांना घाबरणार नाही – रवींद्र धंगेकर

या मोहिमेसाठी दोन पथकं करण्यात आली होती. या दरम्यान गटारीवर कट्टा बांधून केलेलं ठिकठिकाणचं अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं जमिनदोस्त करण्यात आलं. तर फलक आणि छपर्‍यांसाठी लावलेले लोखंडी अँगर कटरनं कापून काढण्यात आलं. हातगाडे, फलक, लोखंडी अँगलही जप्त करण्यात आले. या मोहिमेत अतिक्रमण निर्मुलन पथकातील अधिकार्‍यांसह महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस सहभागी झाले होते. या मोहिमेमुळं मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटल्यानं नागरीकांतून समाधान व्यक्त होत असून प्रशासनानं पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ichalkaranji anti encroachment drive by municipal corporation css