कोल्हापूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत इचलकरंजी येथे वस्त्र संस्कृती विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे करण्यात आले आहे. यातून वस्त्रोद्यो समृद्ध परंपरेचे दर्शन झाले . तथापि या कार्यक्रमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने नियोजनातील भेसाळपणाचे प्रकर्षाने दर्शन घडले.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त विजय राजापुरे, कोष्टी समाजाचे राज्य अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, उद्योगपती शामसुंदर मर्दा, डीकेटीईचे डॉ. वैभव डिगे, संतोष पाटील, चंद्रकांत मगदुम, चित्कला कुलकर्णी, सायबर कॉलेजच्या ज्योती हिरेमठ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी उद्घाटक म अशोक स्वामी यांनी उपस्थितांना संबोधित केले. शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय म्हणुन वस्त्रोद्योगाकडे पाहिले जाते. मात्र या व्यवसायाकडे िंकंबहुना छोट्या यंत्रमागधारकांच्या मागण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. भविष्यात शासनाने हा व्यवसाय टिकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे नमुद करताना सांस्कृतिक आणि वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून वस्त्रोद्योगासाठी काही विशेष योजना राबवता येतात का याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर वस्त्र परंपरा उघड करण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम प्रशंसनीय आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राची पारंपारिक वस्त्र संस्कृती, वस्त्र संस्कृतीमध्ये होत असणारे बदल, वस्त्र संस्कृतीचे महत्त्व आणि वस्त्र संस्कृतीचे जतन संवर्धन यावर विविध मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्र आणि कार्यशाळा याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे संकल्पनेतून ही कार्यशाळा संपन्न होत आहे.

प्राचीन शैली वस्त्र वारसा यावर विनय नारकर यांचे व्याख्यान तसेच प्रो.डॉ. अश्‍विनी अनिल रायबागी यांचे भारतमाता व वस्त्रोद्योग यावर मार्गदर्शन. श्रीमती भाग्यलक्ष्मी घारे हे कोकणातील काथ्या उद्योग यावर भाष्य, तर बाळकृष्ण कापसे हे पैठणी विणकाम आणि बदलते तंत्रज्ञान याविषयी आपले मार्गदर्शन केले. श्रीमती केतकी शहा मुक्कीरवार यांचे खण वस्त्र परंपरा आणि त्यातील बदल यावर व्याख्यान झाले. संगीतकार अजित परब यांचे नेतृत्वाखाली वस्त्र विषयक गाण्यांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

रिकाम्या खुर्च्या साक्षीला

दरम्यान, इचलकरंजीचे सुपुत्र सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने हा वस्त्र संस्कृती हा कार्यक्रम ही होत आहे. मात्र सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाकडे पुरेसे लक्ष दिले नाही. त्याची नियोजनबध्द प्रचार ,प्रसिद्धी करण्यात आली नव्हती. परिणामी उद्घाटन कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्यांची साक्ष दिसत होती. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही प्रेक्षक उपस्थित नव्हते. त्याच्या उल्लेख प्रमुख पाहुणे अशोक स्वामी यांनीही केला. यामुळे यापुढे सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाची नियोजन करताना प्रचार प्रसिद्धीकडे पुरेशी लक्ष देणे गरजेचे आहेत, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.