कोल्हापूर : काहीतरी नजरचुक घडली आणि पूजेसाठी वापरलेला सोन्याचा हार कचरा घंटा गाडीमध्ये पडला. हा प्रकार लक्षात आला आणि मग एकच धावपळ सुरू झाली. मंडळींनी थेट कचरा डेपो गाठला. गाडी चालक आणि सहाय्यक यांनी तत्परता दाखवत शोधाशोध सुरु केली. आणि याच कचऱ्यातून लखलखलता दीड तोळ्याचा सोन्याचा हार शोधून काढून मूळ मालकाच्या हाती सोपवला. इचलकरंजी महापालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकतेचे आणि तत्परतेच्या कार्याचे शुक्रवारी कोण कौतुक होत राहिले.
त्याचे असे झाले, सांगली रस्ता भागात स्टेट बँकेजवळ राजीव फराळे किराणा दुकान आहे. या कुटुंबात काल मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीपूजन करण्यात आले होते. पूजाआवरल्यानंतर आज त्या भागातील घंटागाडी क्रमांक ५६४७ (वार्ड क्रमांक आठ) आली. त्यात निर्माल्य सोबतच पूजेसाठी वापरण्यात आलेला सोन्याचा हार नकळत टाकला गेला. काही वेळानंतर फराळे कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने काही अंतरावर असलेल्या कचरा डेपोकडे धाव घेतली. तोवर तेथे कचरा गाडी यायची होती. भागात फिरून काही वेळाने ती तिथे आली. कचऱ्या सोबत सोन्याचा हार गेला असल्याची माहिती फराळे यांनी घंटागाडीचे चालक करण गागडे व सहाय्यक वैभव गणेश मस्के यांना देण्यात आली.
हेही वाचा : कोल्हापूर महापालिकेच्या नामफलकसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मदत; वर्धापनदिनी अशीही अवस्था
तत्परतेने शोधकार्य
त्यांनी लगेचच मुकादम अमर शेलार, उत्तम पाटोळे, अमित दाभाडे, सचिन कांबळे, लखन कांबळे या सहकाऱ्यांच्या सोबतीने शोधाशोध सुरू केली. दुर्गन्धी येत असलेल्या कचऱ्यात हात घालून तो बाजूला करण्याचे काम सुरु झाले. काही वेळ ही शोधाशोध सुरु राहिले. प्रयत्नांती यश याची खात्री पटली. या कर्मचाऱ्यांच्या हाती सोन्याचा हार हाती लागला. त्यांनी तो राजू फराळे यांच्या ताब्यात दिला अन निराश झालेला त्यांचा चेहरा सोन्यासम लखलखला.
पाठीवर शाबासकीची थाप
इचलकरंजी महापालिका कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेच्या कामाचे कौतुक झाले. आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पाठीवर शाबासकीची थाप दिली. महापालिकेचे कर्मचारी काम नीट करत नाहीत. त्याकडे टाळाटाळ करतात, अशी सार्वत्रिक तक्रार असते. आरोग्य विभाग येथेही ती नेहमीच ऐकायला मिळते. परंतु याला अपवाद ठरत आज इचलकरंजी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सोन्याचा हार कचऱ्यातून शोधून काढण्याचे काम केल्यानंतर त्यांच्यावर समाज माध्यमातून कौतुकाचा वर्षाव झाला.