इचलकरंजी मधील उद्योजकाच्या खुनाचा छडा रविवारी लागला. अशोक सत्यनारायण छापरवाल या उद्योजकाच्या खूनप्रकरणी संदीप महावीर गुरव (वय २९, रा. तारदाळ) व प्रतीक उर्फ बंड्या भाऊसाहेब गुरव (वय, २२, रा. नेर्ली , ता. करवीर)या संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे.
पैशांच्या व्याजाचा तगादा लावल्या मुळे चिडून हत्या केल्याची संशयित आरोपींची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे. हि माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांनी आज सायंकाळी दिली इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले आहे.
इचलकरंजी पासून जवळच असलेल्या तारदाळ (ता. हातकणंगले) येथील रेल्वे फाटकानाजीक अशोक छापरवाल (वय ३९ , रा. महेश कॉलनी , इचलकरंजी ) या उद्योजकाचा गुरुवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी इचलकरंजी व कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी, स्थानिक पोलीस अन्य पथक असे एकत्रित तपास करत होते. त्यांना या हत्येचे गुढ उकलण्यात आज यश आले.
अशोक छापरवाल यांचे शहरातील तसेच शहराबाहेरील लोकांशी पैशांची देवाण घेवाण होती. त्याने संशयित संदीप गुरव यांच्यासमवेत शिसपेन्सिल करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर छापरवाल हा दरमहा दहा टक्के इतके मोठे व्याज आकारत होता. व्याज आणि मुद्दल परत मिळण्यासाठी छापरवाल याने तगादा लावला होता.
त्याला कंटाळून संदीप याने छापरवाल याला चरस व गांजा याचा व्यापार करण्याचे आमिष दाखवून तारदाळ येथील माळभागावर बोलावून घेतले. छापरवाल तेथे आल्यावर अशोक आणि त्याचा चुलत भाऊ प्रतीक या दोघांनी जीवघेणा हल्ला करून ठार मारले. गुरव बंधूंना आज पोलिसांनी तारदाळ येथे सापळा लावून पकडले. त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यांना हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.