कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वादग्रस्त विधानामुळे गाजलेले असते किंवा त्यातील आर्थिक गैरव्यहारावरून वादाचे मोहोळ उठलेले असते. असे गालबोट लावणारे चित्र असताना इचलकरंजीत ५० वर्षांपूर्वी झालेल्या साहित्य संमेलनातील उर्वरित निधीतून स्थापन केलेला ट्रस्ट इतक्या वर्षांनंतर साहित्यविषयक उपक्रमाद्वारे आजही कार्यरत आहे. तेव्हाच्या ट्रस्टच्या निधीत आजही काहीशी वृद्धी झाली आहे.

साहित्य संमेलनातील आर्थिक हिशोबावरून वादाचे पडघम उठत असल्याचे आजवर अनेक संमेलनात साहित्यप्रेमींनी अनुभवले आहे. इचलकरंजीत १९७४ साली झालेले ५० वे साहित्य संमेलन अशा अवगुणांना फाटा देऊन नवतेत भर घालणारे ठरले होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे हे अध्यक्ष आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे उद्घाटक असलेले हे संमेलन पहिले भव्य नियोजनाचे संमेलन म्हणून चर्चेत राहिले.

हेही वाचा : कोल्हापुरात नाताळ सण उत्साहात

त्याकाळी साहित्य संमेलनासाठी निधी संकलन करणे हे आव्हान होते. तरीही संयोजकांनी सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा निधी संकलित केला. संपूर्ण कार्यक्रम, भोजन, सत्कार, मंडप, ध्वनियंत्रणा असा सर्व खर्च भागवण्यात आला. त्यानंतरही श्री शिल्लक होती ५० हजार रुपयांची. तेव्हाच्या मानाने हा आकडा तसा मोठाच. उर्वरित निधीचे काय करायचे अशी चर्चा संमेलनाच्या कार्यकारणी समितीत झाली.

आणि ट्रस्ट आकाराला आला

तेव्हा शशिकला मराठे, दुर्गाताई भिडे या नियोजन समितीतील सदस्यांनी साहित्यविषयक उपक्रम राबवणारा ट्रस्ट (विश्वस्त मंडळ) स्थापन करण्याबाबत सुचवले. त्यातून ‘इचलकरंजी साहित्य संमेलन ट्रस्ट’ ही संस्था नोंदणीकृत झाली. वसंतराव दातार हे अध्यक्ष व संमेलनासाठी पुढाकार घेतलेले डॉ. एस. पी. मर्दा हे कार्याध्यक्ष झाले. २००९ साली दातार यांचे निधन झाल्यानंतर डॉ. विलास शहा अध्यक्ष झाले. अलीकडे डॉ. शहा यांचे निधन झाले असून ट्रस्टची मुख्य जबाबदारी डॉ. मर्दा, आपटे वाचन मंदिराच्या अध्यक्षा सुषमा दातार, वकील स्वानंद कुलकर्णी, कौस्तुभ दातार, हर्षदा मराठे यांच्याकडे आहे.

हेही वाचा : काळम्मावाडी धरण गळतीची तज्ज्ञांच्या समितीकडून पाहणी

वाटचाल ५० वर्षांची

या ट्रस्टकडे संकलित झालेल्या निधीतून सुरुवातीला फारसे काही काम झाले नाही. आपटे वाचन मंदिराने इंदिरा संत यांनी दिलेल्या निधीतून त्यांच्या नावाने उत्कृष्ट पद्य काव्यसंग्रहासाठी २५ वर्षांपूर्वी पुरस्कार सुरू केला. याच उपक्रमात साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टने सहभागी होण्याचा निर्णय २० वर्षांपूर्वी घेतला. त्यातून या ट्रस्टच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट गद्य साहित्यकृती तसेच दोन लक्षणीय गद्य कृतीचे दोन अशा एकूण तीन पुरस्कारांसाठी १५ हजार रुपये दिले जातात. सध्या या ट्रस्टकडे ७० हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. त्याच्या व्याजातून पुरस्कारासाठी रक्कम दिली जाते. एखाद्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेला ट्रस्ट ५० वर्षांनंतर आपले मिणमिणते का असेना आपले अस्तित्व टिकवून आहे.

Story img Loader