कोल्हापूर : इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून १ महिन्यात अहवाल सादर करून पाणीप्रश्न निकाली लावणार होते. मात्र, चार महिने झाले तरीही कोणताच अहवाल न दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय येत आहे. जिल्हाधिकारी यांनी टाळाटाळ न करता अहवाल पाठविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.
मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचा फार्स करून एक महिन्यात अहवाल देण्याचा आदेश केला. यानंतर जिल्हाधिकारी यांना वारंवार याबाबत पाठपुरावा केल्यानंतर २५ मेपर्यंत अहवाल शासनाकडे करणार होते. २८ मे रोजी जिल्हाधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता जलसंपदा विभाग व इतर विभागाचा अहवाल न आल्याने २८ मे रोजी पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व इचलकरंजी महापालिका आयुक्त यांना नोटीसा काढून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पण आज अखेर अहवाल आलेला नाही.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी संबधित यंत्रणेला पुन्हा तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा – कोल्हापुरात अनोख्या स्वागताने पहिल्याच दिवशी शाळेतील मुले आनंदी
पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष होणार
दरम्यान, १५ दिवसांत अहवाल न दिल्यास प्रशासनाचीही इचलकरंजी शहराला पाणी देण्याबद्दलच्या भूमिकेबद्दलचा संशय स्पष्ट होणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर याची तीव्रता कमी होवून पुन्हा दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.