इचलकरंजीत एका उद्योजकाची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचे उघड झाले असून अशोक सत्यनारायण छापरवाल (वय ३५) असे या उद्योजकाचे नाव आहे. तारदाळ येथे रेल्वेफाटकाजवळ छापरवाल यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इचलकरंजीतील महेश कॉलनी परिसरात छापरवाल कुटुंबीय राहतात. छापरवाल कुटुंबीय हे कापड विक्री क्षेत्रातील बडे प्रस्थ आहे. छापरवाल कुटुंबाचा अत्याधुनिक यंत्रमागचा मोठा कारखाना आहे. शर्ट, सुटिंगचे ते नामांकित व्यापारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून वस्त्रोद्योगातील लक्ष कमी करून अशोक छापरवाल लॉटरी व्यवसायात उतरले होते, अशी देखील चर्चा होती.

गुरुवारी दुपारपासून छापरवाल कुटुंबीयांचा अशोक यांच्याशी संपर्क होत नव्हता. शेवटी रात्री उशिरा छापरवाल कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अशोक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी तारदाळ भागात अशोक छापरवाल यांचा मृतदेह सापडला. तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. अशोक छापरवाल यांच्या हत्येमुळे इचालकरंजीच्या व्यापारी क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

Story img Loader