लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी इचलकरंजीतील तरुणाच्या खून प्रकरणाचे धागेधोरे तेलंगणा राज्यात असल्याचे आज उघडकीस आले. या खून प्रकरणी तेथील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
भारत पांडुरंग येशाळ (वय ३८ रा. इचलकरंजी) हा ट्रक रिपेअरीचे काम करतो. ७ जानेवारी रोजी त्याला ट्रक बंद पडला आहे. दुरुस्त करण्यासाठी यायला पाहिजे, असा मोबाईलवर निरोप आला होता. त्यानुसार तो हातकणंगले-कोरोची रस्त्यावर गेला होता. तेथे त्याचा धारदार शस्त्राचे २४ वार करून अज्ञातांनी खून केला. या प्रकरणी त्याचे वडील पांडुरंग येशाळ यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली होती.
आणखी वाचा-कोल्हापूरात दोन वर्षात २१ मोबाईल टॉवर चोरीस; पोलिसात फिर्याद दाखल
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तीन पोलीस पथके तयार केली होती. सीसीटीव्ही फुटेज , तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने मिरीयाला यादगिरी महेश ( २६ ) व त्याचे साथीदार गजूला सत्यनारायण शिवशंकर ( २७ ) व मोहम्मद अमीर मोहम्मद शरीफ खान ( २४ , सर्व राहणार श्रीराम कॉलनी, हैदराबाद) यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपी मिरीयाला महेश याचे भारत याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्यावरून भारत हा पत्नी सतत त्रास देऊन मारहाण करत होता. या कारणातून या तिघांनी भारत याचा खून केल्याची कबुली दिली आहे. या तिघांना अटक करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.