कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या दूधगंगा नदीतील सुळकुड नळपाणी योजनेला स्थगिती दिलेली नाही. याबाबत कागल तालुक्यातून विरोधाची भूमिका मांडली आहे. इचलकरंजीतून पाणी मिळावे अशी भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही बाजू ऐकून घेऊन राज्य शासनाकडे अहवाल पाठवला जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार योजनेबाबत पुढील कृती केली जाईल, असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केले.
इचलकरंजी महापालिकेने कागल तालुक्यातील सुळकुड येथून नळपाणी योजना राबवण्याची तयारी केली आहे. त्याला शासनाने मान्यता देऊन १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या योजनेमुळे कागल तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडते, असा मुद्दा उपस्थित करून कागल तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी इचलकरंजीची योजना होऊ देणार नाही, असा निर्धार जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत केला होता. या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील दूधगंगा सुळकुड योजना अंमलबजावणी कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेतली. त्यांनी आक्रमकपणे दूधगंगा योजना झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली. समितीचे समन्वयक विठ्ठल चोपडे यांनी दूधगंगा योजनेचा प्रवास कथन करून इचलकरंजीला पाणी कसे देणे शक्य आहे याचे विवेचन केले.
खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी हे काही पाकिस्तानातील गाव नाही. त्याला पाणी देणे बंधनकारक आहे. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने ते इचलकरंजीला देणे आवश्यक आहे, असा मुद्दा मांडला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कर्नाटकला मंजुरीपेक्षा अधिक पाणी सुळकुडमधून सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीला पाणी नाकारण्याचा अधिकार तेथील लोकांना नाही, अशी भूमिका मांडली. माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीचा पाण्यावर कायदेशीर हक्क आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसारच हे पाणी मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये माजी आमदार राजीव आवळे, जनता दलाचे महासचिव प्रताप होगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य मदन कारंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, माजी नगरसेवक सागर चाळके, हिंदुराव शेळके, दत्ता माने, अजितमामा जाधव, राहुल खंजीरे, नितीन जांभळे, महादेव गौड, ध्रुवती दळवाई आदींनी भूमिका मांडत इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीतून पाणी मिळणे कसे न्याय आहे याची तपशीलवार मांडणी केली.
हेही वाचा – “नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच…”, अजित पवारांकडून स्तुतीसुमनं
त्यावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका येथील मल:निसरणाचे काम लवकरच पूर्ण होईल. दोन वर्षांनंतर पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी येणार नाही. इचलकरंजीचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. कागल तालुक्याचे त्यावर दुमत नाही. फक्त हे पाणी वारणा, कृष्णा नदीतून कसे घेता येईल याची माहिती त्यांनी दिलेली आहे. दोन्ही बाजू समजून घेऊन याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.