कोल्हापूर : दुधगंगेच्या पाण्यासाठी मनाची साखळी करीत इचलकरंजीकर एकवटल्याचे बुधवारी दिसून आले. यावेळी श्रेयवादाचे राजकारण दिसून आले. आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याने एकीच्या प्रयत्नांना गालबोट लागले. कागल तालुक्यातून दुधगंगा पाणी योजनेला विरोध होत आहे. तर इचलकरंजीत आज क्रांती दिनी जय सांगली नाका ते महासत्ता चौकापर्यंत अशी सुमारे तीन किलोमीटर लांब मानवी साखळी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुळकुड पाणी योजना कृती समितीचे सर्व सदस्य, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातातील फलक आणि डोक्यावरील घागरी लक्ष वेधून घेत होते. आंदोलनात सांगली रोड परिसर, सांगली नाका ते पोट फाडी चौक भागातील सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, लहान मुलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा >>> इचलकरंजीला पाणी देण्याविरोधात शिरोळ तालुक्यातील पाच गावात शुक्रवारी बंद

राजकीय वादाची किनार

मानवी साखळीला राजकीय वादाची किनार लागली. पक्षीय झेंडे घेऊन आंदोलनात उतरायचे नाही असा निर्णय झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बिल्ले लावून आल्याने त्यांना ते काढण्यास भाग पाडण्यात आले. तर आंदोलनाविषयीचे माहिती माध्यमांना कृती समिती सदस्यांनी द्यायचे असे ठरले असताना स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बाईट देत असताना त्यास आक्षेप घेऊन रोखण्यात आले. आंदोलनावेळी आपल्या प्रभागातच माजी नगरसेवक, स्थानीक कार्यकर्त्यांनी थांबायचे असे निश्चित झाले होते. पण आमदार प्रकाश आवाडे हे आंदोलनाच्या मार्गावर फिरत असल्याने त्यांनाही रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते आमदार असल्याने एका जागी न थांबता त्यांना अन्यत्र जाण्याची मुभा असू शकते असे उत्तर दिल्याने मतभेद निर्माण झाले. खासदार धैर्यशील माने यांनी भ्रमणध्वनी वरून भाषण केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ichalkaranjikar united for dudhganga water cases of political controversy ysh
Show comments