कोल्हापूर : चौंडेश्वरी देवीच्या उत्सवानिमित्त इचलकरंजीतील देवांग मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी चौंडेश्वरी देवीची मुखवटा मिरवणूक भाविकांचे आकर्षण ठरली.
ज्येष्ठ अमावश्या निमित्त चौंडेश्वरी देवीच्या उत्सवानिमित्त देवांग समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन मंगळवार पेठेतील मंदिरात करण्यात आले होते. आज उत्सवाचा मुख्य दिवस होता. सकाळी विठ्ठलराव डाके कुटुंबीयांच्या वतीने अभिषेक करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नीलिमा दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पुढील मानकरी – मागील मानकरी यांनी पालखी मंदिरातून नेल्यानंतर सवाद्य मिरवणुकीने ती गावभागातील बनशंकरी मंदिरात पोहोचली. तेथे चौंडेश्वरी देवी – बनशंकरी देवीच्या भेटीचा सोहळा उत्साहात झाला. यानंतर पालखी पुन्हा मंदिरात आली.
आणखी वाचा-कोल्हापुरात पाणी पातळीत किंचित घट; जांबरे प्रकल्प काठोकाठ
या मिरवणुकीमध्ये समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, राजेंद्र सांगले,डी. एम. कस्तुरे, महादेव कांबळे मोहन सातपुते, मधुकर वरुटे, उत्सव समितीचे अध्यक्ष सुमंत बुगड, संजय कांबळे, उदय बुगड, महेश सातपुते, विजय मुसळे, स्मिता सातपुते, दीपा सातपुते, भारती कांबळे ,स्मिता बुगड, प्रशांत सपाटे, प्रमोद मुसळे ,निवास फाटक, शितल सातपुते यांच्या सह समाजाचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.
मुखवटा मिरवणूक आकर्षण
दरम्यान शाहू हायस्कूल जवळील म्हेतर गल्लीतून प्रतिवर्षाप्रमाणे चौंडेश्वरी मुखवटा मिरवणुकीला प्रारंभ झाला. दुपारी पावसांच्या हलक्या सरीमध्ये पारंपरिक वाद्याच्या निनादात निघाली चौंडेश्वरी देवीची मुखवटा मिरवणुक भाविकांचे आकर्षण ठरली. देवी काठीने युद्ध करत निघते. म्हणजे देवी दैत्याचा संहार करते असे दृश्य असते. शहराच्या विविध ठिकाणी मुख्य चौकांमध्ये हे पाहण्यासाठी गर्दी झाली होती.