लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : इचलकरंजी शहराला सुळकुड नळ पाणी योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर ते सायंकाळी मागे घेण्यात आले.
इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड नळ पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा होत नसल्याने तसेच दुर्लक्ष होत असल्याने चार महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून आज महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रमुख नेते, युवक, महिलांचा सहभाग अधिक होता.
आणखी वाचा-कोल्हापुर जिल्ह्यातील ३२ सहकारी संस्था प्रतिनिधींना दिल्ली हवाई यात्रेचा मान
अशी घडली शिष्टाई
आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या माध्यमातून बेमुदत उपोषणाला बसलेल्या सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे यांची प्रकृती खालावत असल्याने प्रशासनाने दक्षता घेतली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे पत्र घेऊन प्रांताधिकारी मोसमी बर्डे, महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, तहसीलदार कल्पना ढवळे सायंकाळी आंदोलनस्थळी आले. त्यांनी खासदार धैर्यशील माने हे मुख्यमंत्र्यांकडे पाणी योजनेबाबत बैठक घेतील असे पत्र सादर केले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात बैठक होण्याची शक्यता आहे. कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे, विठ्ठल चोपडे, नितीन जांभळे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.