श्रेयासाठी राजकीय पक्षांत चढाओढ

पांढरा हत्ती म्हणून ज्याची संभावना झाली ते इचलकरंजी नगरपालिका मालकीचे आयजीएम हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरण करून घेण्याला मंगळवारी राज्य शासनाने हिरवा कंदिल दाखविला. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी त्याचे श्रेय घेण्यासाठीही राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली असून आपल्याच पाठपुराव्यामुळे निर्णय केल्याचा दावा केला जात आहे. दर्जेदार वैद्यकीय सेवेला मुकलेली सामान्य जनता मात्र आगामी काळात आयजीएममधून सर्व सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत आहे.

तीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहरासाठी इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय उभे करताना नगरपालिकेने कसलीच कसर ठेवली नव्हती. पण नवेपण सरण्याच्या आधीच हे रुग्णालय  स्वतच रुग्णाईत बनले. ३५० खाटांचे रुगणालय चालवणे पालिकेच्या सर्व प्रकारच्या कुवती पलीकडचे बनले. त्यातून हा पांढरा हत्ती शासनाने चालवायला घ्यावा, अशी जोरदार मागणी होऊ लागली. अखेर आयजीएम हॉस्पिटल हस्तांतरण करून घेण्याला मंगळवारी राज्य शासनाने हिरवा कंदिल दाखवला. पाठोपाठ आपलीच पाठ थोपटण्याची स्पर्धाच वस्त्रनगरीत रंगली.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, हॉस्पिटलचे अखेर शासनाकडे हस्तांतरण झाले असून  हा  ऐतिहासिक निर्णय आहे.  इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील पाच गावांसह शिरोळ व हातकणंगले तालुका तसेच सीमाभागातील १० लाख लोकसंख्येला शहरातच सर्व आरोग्यसेवा मिळणार आहेत. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष दवाखाना सुरू होईल.

न्यायालयीन लढय़ाला यश आले असून  कष्टकरी जनतेचा हा विजय असल्याचे उच्च न्यायालयाचे वकील धर्यशील सुतार यांनी म्हटले आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये उच्च न्यायालयात आयजीएम शासनाकडे हस्तांतरित करावे यासाठी जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने मागील आठवडय़ात हस्तांतरणाच्या प्रस्तावावर राज्य शासनाने निर्णय घ्यावा असा आदेश दिला. त्यानंतर मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन हस्तांतरणावर शिक्कामोर्तब केले. हा प्रश्न सध्या कायमस्वरूपी निकालात निघाल्याने लोकप्रतिनिधींचे विषयाकेंद्रित राजकारण बंद झाले याचे समाधान झाल्याचा टोला त्यांनी लगावला. आयजीएम संदर्भात सातत्याने भूमिका बदलणाऱ्या आमदार सुरेश हाळवणकर यांनी आत्मपरीक्षण करावे. हस्तांतरणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात येताच ते आपणच पाठपुरावा केल्याचा डांगोर पिटत आहेत. हस्तांतरणाचा ठराव काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेच केला असल्याने आमदार हाळवणकर यांनी त्याचे फुकटचे श्रेय लाटू नये, अशी टीका काँग्रेस नगरसेवक शशांक बावचकर यांनी केली आहे.

साखर, पेढे  वाटप

दरम्यान,  शासनाच्या या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटरसायकल रॅली काढून साखर पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.  इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने साखर वाटप करून स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघ, याचिकाकत्रे यांच्यावतीने फटाके उडवून शासन निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

 

Story img Loader