कोल्हापूर : गारगोटी तहसील कचेरीसमोर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे बुधवारी आंदोलन झाले. या आंदोलनाला विविध गावातून शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. सकाळी साडेदहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन असता त्याला शेतकऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी गिरीश फोंडे म्हणाले,” शेतकरी विरोधी महामार्ग लागणारे धोरण करते हे भांडवलदार यांचे हस्तक आहेत. हा अन्याय सहन केला तर हे राज्यकर्ते सरकारच कंत्राटवर चालवायला देतील. हे मंत्री स्वतःची ओळख शेतकऱ्याचा मुलगा म्हणून करून देत असली तरी ते भांडवलदारांना दत्तक गेले आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा पश्चिम घाटातील पर्यावरणाला घातक असून शेतकरी याचा बळी ठरेल.
हेही वाचा…शक्तीपीठ महामार्गाचे भूमी अधिग्रहण, रस्ते बांधकामात १२ हजार कोटीचा घोटाळा; राजू शेट्टी यांचा आरोप
अधिकाऱ्यांना गावबंदी
यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील म्हणाले,” कोणीही मागणी न करता शासनाने हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लागला आहे. प्रत्येक गावामध्ये जमीन संपादनासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गाव बंदी करा. गावागावात बोर्ड लावून आमची जमीन देणार नाही असा इशारा द्या. यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे, अजित दादा पवार, नाथाजी पाटील, धनराज चव्हाण यांची भाषणे झाली.
हेही वाचा…हातकणंगलेत ‘मविआ’ उमेदवार देणार; राजू शेट्टींना आव्हान?
२३ गावात लढा उभारणार
यावेळी भुदरगड तालुक्यातील २३ गावांमधून विविध मार्गाने शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करण्याचे ठरले. आंदोलनाची तीव्रता येणाऱ्या काळात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.