कोल्हापूर : शाळा इमारतीच्या भाड्यापोटी एक महिन्याचे ९५ हजार ५७७ रुपये वेतनाची रक्कम लाचरूपात मागणी करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिपाई अशा तिघांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी धरणगुत्ती (तालुका शिरोळ) येथील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अण्णासाहेब विभुते विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे संस्था अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी, मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील व शिपाई अनिल बाळासाहेब टकले यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार या अण्णासाहेब विभुते विद्या मंदिरात शिक्षक आहेत. त्यांच्याकडे संस्था अध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी शाळा इमारत भाड्यापोटी एप्रिल महिन्याच्या ९५,५७७ रुपये इतक्या वेतनाची रक्कम लाच स्वरूपात दोन हप्त्यात द्यावी, ती न दिल्यास तक्रारदारांची वेतनवाढ रोखली जाईल, असा दबाव निर्माण केला होता. अध्यक्षांनी लाचेची रक्कम मुख्याध्यापक महावीर पाटील यांच्याकडे देण्यास सांगितली. तर मुख्याध्यापकांनी लाचेची रक्कम शिपाई अनिल टकले यांच्याकडे देण्यास सांगितले. टकले यांनी लाचेची रक्कम स्वीकारली असताना रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलीस उपनिरीक्षक निंबर्गेकर, प्रकाश भंडारे यांच्या पथकाने कारवाई केली.