कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी चंदगड येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यावरून शनिवारी अजितदादा राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील छुप्या राजकीय स्पर्धेचे दर्शन घडले. अजित पवार चंदगडमध्ये येण्यापूर्वीच चंदगड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख आणि गतवेळचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार शिवाजी पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अनावरण केले. तर पुतळा अनावरणास रीतसर परवानगी मिळाली नसल्याने अजित पवार यांनी या कार्यक्रमाकडे जाण्याचे टाळले. त्यांनी या पुतळ्यास शासनाकडून लवकर मान्यता मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या निमित्ताने शिवाजी पाटील यांनी त्यांचे राजकीय स्पर्धक, चंदगडचे अजितदादा गटाचे आमदार राजेश पाटील यांना शह दिल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल अभिषेक

चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी रवळनाथ मंदिराशेजारी बाजारपेठेत शिवाजी महाराजांचा सुमारे वीस फुटाचा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे. पुतळा अनावरणाची नागरिकांना प्रतीक्षा असताना काल संभाजीराव भिडे गुरुजी यांनी पुतळ्यास अभिषेक घातला होता. तर आज या पुतळ्याचे अजित पवारांच्या हस्ते अनावरण करण्याचे ठरले होते.

हेही वाचा – सरकार बरखास्त करण्याची विरोधकांची मागणी अर्थहीन – अजित पवार

आज अनावरण

तत्पूर्वीच शिवाजी पाटील, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शांताराम बापू पाटील, सरचिटणीस लखन बिरजे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन बल्लाळ आदी पुतळ्याजवळ गेले. शिवाजी पाटील यांनी भलामोठा गुलाब पुष्पहार शिवाजी महाराजांना अर्पण केला. त्यावरील पडदा दूर करून पुतळ्याचे अनावरण केले.

अजितदादा पत्र देणार

दरम्यान,सायंकाळी उपमुख्यमंत्री पवार चंदगडमध्ये आले. शासकीय अधिकाऱ्यांनी यापुतळा स्मारकास रीतसर परवानगी नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पवार यांनी याची कल्पना आधीच दिली असती तर परवानगीचे पत्र आणले असते. आज शासकीय सुट्टी आहे. लवकरच याबाबतचे पत्र देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

हेही वाचा – इचलकरंजीच्या सुळकुड पाणीप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणार; पाणी कृती समितीच्या बैठकीत निर्णय

चंदगडच्या विकासाला निधी

चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे ८५० कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी ५ कोटींचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. चंदगड हा डोंगराळ व दुर्गम भाग असून त्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगड येथे आश्वासन दिले. ते नगरपंचायतीच्या कै. नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत व प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला अनावरण तसेच चंदगड नगरपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार समारंभावेळी बोलत होते. या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) २० टक्के अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandgad bjp checkmate to ajitdada group the unveiling of shivaji maharaj statue turned into a political drama ssb
Show comments