कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या रखडलेल्या दूधगंगा नळ पाणी योजनेचा प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे याबाबतचा अहवाल सत्वर जावा, या मागणीसाठी इचलकरंजीत कृती समितीने शुक्रवारी जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी आमदार प्रकाश आवाडे यांना टीकेचे लक्ष्य केले. इचकरंजी शहराला शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध झालेच पाहिजे व त्यासाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत केलीच पाहिजे, यासाठी कृती समितीच्यावतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात पाणी भरपूर आहे, पाण्याची कोणतीही अडचण नाही, असे म्हणणाऱ्या आमदार प्रकाश आवाडे यांना गावात आठ-आठ दिवस पाणी येत नाही, हे दिसत नाही का, असा सवाल इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी केला. हा दिशाभूल करण्याचा व जनतेला फसवण्याचा धंदा असून विरोधकांना मदत करण्याचा तसेच स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्याचा धंदा आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा : कोल्हापुरात वटपौर्णिमेनिमित्त पूजा, व्रत, वाणवाटप

होगाडे यांनी आमदार आवाडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आमदार आवाडे यांचा येणाऱ्या निवडणुका ६ महिने पुढे ढकलण्याचा हेतू आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांचा योजनेबाबत अहवाल येणार आहे, त्यानंतर हे आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी मदन कारंडे यांनी, शहरात प्रचंड पाणी टंचाई आहे, याची माहिती असूनही मुबलक पाणी आहे, असे म्हणणे म्हणजे शासनाने मंजुरी दिलेली पाणी योजना नको आहे. एकीकडे शासनाने ही योजना पूर्णत्वास आणावी, यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत. पण आमदार आवाडे यांनी मुद्दामहून कागलच्या लोकांच्या मागणीला पाठबळ देण्याचे काम करत आहेत, असा टीका केली. तसेच पालकमंत्र्यांनी रक्तपाताच्या केलेल्या वक्तव्याची प्रतिकृती आमदार आवाडे यांनी अप्रत्यक्षपणे करत आहेत आणि त्यांना मदत करत आहेत, असे आम्हाला वाटत आहे, अशी टीकाही कारंडे यांनी केली.

हेही वाचा : गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी कार्यालयावर ठाकरेसेनेचा मोर्चा, आंदोलक- पोलिसांत शाब्दिक चकमक

आंदोलनात, मदन कारंडे, शशांक बावचकर, सयाजी चव्हाण, संजय कांबळे, विकास चौगुले, कॉ. सदा मलाबादे, प्रकाश सुतार, सुहास जांभळे, अमरजीत जाधव, शिवाजी साळुंखे, भरमा कांबळे, सुनील बारवाडे, प्रसाद कुलकर्णी, अभिजीत रवंदे, युवराज शिंगाडे, विजय जगताप, उषा कांबळे, राहुल सातपुते, सुषमा साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : राज्यातील ८३०५, कोल्हापुरातील २७१ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; पावसाचा परिणाम

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळेझाक करून केवळ पैसे खाण्याचा उद्योग करण्यासाठी पाण्याचे प्लांट बसवण्यात आले. शहरात एकूण ६८ ठिकाणी प्लांट बसवले असले तरी, त्यातून पाणी नेणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. याचा अर्थ नागरिकांना या पाण्यावर विश्वास नाही, असे दिसते. त्यामुळे केवळ खिसे भरण्यासाठी हा उद्योग केला आहे, असा आरोप शशांक बावचकर यांनी केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ichalkaranji agitation for dudhganga water mla prakash awade criticized by the protesters css