कोल्हापूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात (सीएए ) अधिसूचना जारी करण्यात आल्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने इचलकरंजीत साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मसुदा संसदेत सादर होऊन पाच वर्षे उलटली. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात हा कायदा लागू केला जाईल असे विधान अलीकडेच केले होते. तर, सोमवारपासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात आला आहे.
या निर्णयाचे इचलकरंजी भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवतीर्थ येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी साखर वाटप केली. भारत माता की जय, वंदे मातरम, मोदी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. शहराध्यक्ष अमृत भोसले, महिला अध्यक्ष अश्विनी कुबडगी, बाळासाहेब तोतला, उमाकांत दाभोळे, दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.