इचलकरंजी : शहरासाठी सुळकुड पाणी योजनेसाठी लढा सुरू असताना शिरोळ तालुक्यातील शिरटी येथून कृष्णा नदीतून पाणी पुरवठा योजना राबवण्याचा पर्याय पुढे आणला जात असताना आता या वादात आणखी एका पाणी योजनेची भर पडली आहे. वारणा धरणातून थेट पाईपलाईन हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठी योग्य पर्याय असल्याची भूमिका पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती, शाहीर विजय जगताप यांनी शनिवारी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत त्यांनी सांगितले की, इचलकरंजी शहरातील वाढत्या नागरीकरण, उद्योगासाठी भावी काळात मुबलक पाण्याची आवश्यकता आहे. यापुर्वी आपण स्वतः पाणीपुरवठा सभापती असताना साडेतीन मीटरचा बंधारा उभारला. शहरात २५० हून अधिक बंकर्स मारून पाईपद्वारे पाणी पुरविले. सध्या शहरातील भुगर्भातील पाणी पातळी कमी होत असल्यामुळे बोअर्सही अपुरे पडणार आहेत. १९८५ पुर्वी या शहरासाठी थेट वारणा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणून टोप येथे साठा करावयाचा आणि ते पाणी चोकाक ओढ्यातून इचलकरंजीसाठी सोडायचे अशी योजना होती. पण नदीतील प्रदूषण वाढल्याने ती योजना मागे पडली. कुंभोज पाणी योजनाही काही अडचणींमुळे रद्द झाली.

हेही वाचा : वस्त्रोद्योग संशोधनातील भारतीय भरारी ! इचलकरंजीतील उद्योजकाने तयार केले भारतीय ‘जेकार्ड’ यंत्र

त्यानंतर काळमावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा विषय पुढे आला. ८० किलोमीटर अंतरासाठी ८० कोटी रुपये खर्च यैणार होता. जकात कर सुरु असल्याने नगरपालिकेची आर्थिक स्थितीही चांगली होती. नगरपालिकेने तसा ठरावही कैला होता. पण अचानक हा पर्याय बाजूला राहून कृष्णा योजनेसारखी गळकी, फुटकी योजना राबविली गेली. यानंतर राज्यकर्त्यांनी दानोळी, कोथळी आणि आता सुळकूड योजना आणून इचलकरंजी महानगरपालिकेला कटोरा घेऊन दारोदार फिरवण्याचे काम सुरु केले आहे. कालच ज्या नदीवर सूळकूड योजना पुढे आली आहे. त्या नदीचे पात्र कोरडे पडल्याचे फोटो वर्तमानपत्रात आले आहेत, असे शाहीर विजय जगताप यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : उसाचे थकीत १०० रूपये द्या, अन्यथा कारखान्यांची साखर अडवणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखानदारांना इशारा

शाहीर जगताप पुढे म्हणाले, आपल्या परिसरातील वारणा या धरणात पाणीसाठा आहे. पण पाणी वाटपाची योजना नाही. वारणा नदीचे हे पाणी थेट कालव्यातून इचलकरंजीपर्यंत येणार होते. परंतु वाटेतल्या काही गावांनी आम्हाला या पाण्याची गरज नाही, असे सांगून ही योजना थांबवली. २६ किलोमीटरपर्यंत या कालव्याचे काम झाले आहे, असे समजते. या एकूण परिस्थितीत इचलकरंजीसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणणे हा एकमेव पर्याय दीर्घकालीन व सुरक्षित आहे. इचलकरंजी ते वारणा धरण हे अंतर अंदाजे १०० किलोमीटर आहे. नवीन तंत्राने धरणाबाहेर जकवेल बांधून या पाणीपुरवठ्यात सातत्य ठेवणे शक्य आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. आता सवाल आहे इचलकरंजीच्या राजकीय नेत्यांच्या ठाम इच्छाशक्तीचा. आज केंद्रात आणि राज्यात एकमुखी सत्ता आहे. शासन कोल्हापूरला थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करुन देत असेल तर मग सोन्याचे अंडे देणाऱ्या इचलकरंजीसाठी हा दुजाभाव कशासाठी? आमच्या भागाचे पालकमंत्री , आमदार, खासदार, सत्तापक्षाचे कार्यकर्ते हे सारे शक्तिमान आहेत. तेव्हा आपले कर्तृत्व दाखविण्याची हीच संधी आहे. आणि शहरातील मतदारांसाठीही हीच योग्य वेळ आहे. तेव्हा आलेली संधी दवडू नये व इचलकरंजीची पाणी समस्या कायमची सोडवावी, असे आवाहन एका पत्रकाद्वारे माजी पाणी पुरवठा सभापती शाहीर विजय जगताप यांनी केले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ichalkaranji vijay jagtap said pipeline from the warna dam is solution to water problem css