कोल्हापूर : नागाळा पार्क येथील सृष्टी शिंदे या २१ वर्षीय तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्याने रेबीज होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. यांनतर शहरात संतापाची लाट उसळली. महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने बुधवारी महापालिकेसमोर आसूड आंदोलन केले. पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा सोसणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर कोल्हापूरकर आसूड ओढतानाचे प्रतिकात्मक आंदोलन करून आपने महापालिकेचा निषेध केला.
भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी आहे. दोन डॉग व्हॅन व फक्त १२ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण विभागाची भिस्त आहे. निर्बीजिकरण करणे हा एकमेव परिणामकारक उपाय आहे. परंतु दिवसाला २-३ कुत्र्यांचेच निर्बीजिकरण होते. एका वर्षात सात हजार कुत्र्यांचे निर्बीजिकरण केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. नागरिकांचा जीव जात असताना प्रशासकांनी बघ्याची भूमिका न घेता जबाबदारी निश्चित करून गांभीर्य नसलेल्या संबंधित पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी देसाई यांनी केली.
हेही वाचा : शक्तीपीठ मार्ग कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली नको ती कल्पना – आमदार सतेज पाटील
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, ऍड. सी. व्ही. पाटील, समीर लतीफ, मोईन मोकाशी, राकेश गायकवाड, डॉ. कुमाजी पाटील, मयूर भोसले, रवींद्र राऊत, राजेश खांडके, रणजित पाटील, शशांक लोखंडे, रमेश कोळी, आदम शेख, अमरसिंह दळवी, सफवान काझी, कुणाल रणदिवे, आनंदराव चौगुले आदी उपस्थित होते.