कोल्हापूर : रिक्षा पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रूपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे. या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी आम आदमी रिक्षाचालक संघटनेने शुक्रवारी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासन आणि आप शिष्टमंडळाची बैठक परिवहन कार्यालयात पार पडली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दंडा संबंधी निर्णय घेणे शक्य नाही असे अधिकारी सांगत आहेत. तसेच यावर मंत्रालयीन स्तरावर निर्णय व्हायचा झाल्यास तो आचारसंहिता झाल्यावर होऊ शकतो. तसे असल्यास जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रिक्षा तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) तपासणी शिथिल करण्यात यावी अशी मागणी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी बैठकीत केली. यावर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करू असे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
हेही वाचा : कोल्हापुरात पासिंगच्या दंडाविरोधात आपचे आंदोलन; दंडात्मक कारवाई थांबवा अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा
यावेळी रिक्षा आघाडी शहराध्यक्ष संजय नलवडे, राकेश गायकवाड, लाला बिर्जे, बाबुराव बाजारी, आनंदा चौगुले, मंगेश मोहिते, शकील मोमीन, सुभाष शेटे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मयुर भोसले, उमेश वडर आदी उपस्थित होते.