कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होताच चार मतदारसंघांत बंडाचे झेंडे लागले आहेत. काही ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीवरून तर जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. सोमवारी कोल्हापुरातील काँग्रेसची उमेदवारी बदलण्याची वेळ येवून ती छत्रपती घराण्यातील मधुरीमाराजे छत्रपती यांना देण्यात आल्याने पेच वाढला आहे. महाविकास आघाडी अंतर्गत बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक पाच जागा गेल्या आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात रात्री उशिरा राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सामाजिक अभियांत्रिकीकरण करण्याचा सल्ला राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिला होता. त्यातूनच इतर मागासवर्गीय असलेले लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्र सेवा दलात जडणघडण झालेले लाटकर यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे काम सुरू केले. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. मध्यरात्री जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेक झाली. शहर अध्यक्ष सचिन चव्हाण समर्थकांनी हा प्रकार केल्याचे सांगितले जाते. तेथे हॅशटॅग चव्हाण पॅटर्न असे फलक रंगवले गेले. यावर सचिन चव्हाण यांनीही अजूनही वेळ गेलेली नाही. उमेदवारी बदलावी अशी मागणी नगरसेवकांच्या मोठ्या गटाने केली आहे. परिणामी सूत्रे हलून लाटकर यांच्याऐवजी मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय रातोरात घेण्यात आला. यावर लाटकर समर्थकांनी नाराजी दर्शवली. कोल्हापूरचा तिढा आणखीनच वाढला आहे.

आणखी वाचा-साखरेची किमान विक्री किंमत वाढीचा प्रस्ताव लांबणीवर, केंद्रीय मंत्रिगटाचा निर्णय; साखर उद्योगात नाराजी

राधानगरी मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी मशाल हाती घेतली आहे. नाराज झालेले त्यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी चालू केली आहे. येथे उद्धव ठाकरे, काँग्रेसमध्ये नाराजी दिसत आहे. इचलकरंजी मतदारसंघ काँग्रेसकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे. येथे काल प्रदेश सचिव मदन कारंडे यांची उमेदवारी जाहीर झाली. स्पर्धेत असलेले गतवेळचे उमेदवार राहुल खंजिरे, शहर अध्यक्ष संजय कांबळे, स्मिता संजय तेलनाडे असे इच्छुक नाराज झाले आहे. तर राष्ट्रवादीचेच माजी आमदार अशोक जांभळे यांचे पुत्र सुहास जांभळे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची हालचाल सुरू केली आहे. चंदगडमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने नंदाताई बाभुळकर यांना रिंगणात उतरवले असले तरी आघाडीतील सर्वच इच्छुक नाराज झाले आहेत.

आणखी वाचा-उसाला ३७०० रुपये उचल द्यावी; ‘स्वाभिमानी’च्या परिषदेत मागणी

एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा वाद अधिक वाढणार नाही असा विश्वास आघाडीचे नेते व्यक्त करीत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीकडे लोकांचा कल असल्याने उमेदवारीची स्पर्धा जोरदार होती. त्यामुळे इच्छुकांच्या समर्थकांकडून काही प्रकार घडले आहेत. सर्वच इच्छुकांची समजूत घातली जात आहे. त्याला निश्चितपणे यश येईल. आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, असा विश्वास काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur an invitation to fight over the candidacy of mahavikas aghadi mrj