कोल्हापूर : शेत जमिनीवर सातबारा पत्रके नाव नोंद करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणी केल्याबद्दल कोडोली येथील मंडल अधिकारी व खासगी व्यक्ती अशा दोघांवर शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. अभिजीत नारायण पवार (रा. कोल्हापूर) असे या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. तर रणजीत उर्फ आप्पा आनंदराव पाटील ( रा. कोडोली, ता. पन्हाळा) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा : कोल्हापुरातील पासिंग दंडावरील कारवाई थांबवा; परिवहन अधिकाऱ्यांकडे ‘आप’ची मागणी
यातील तक्रारदारांच्या काकांनी शेतजमीन घेतली आहे. तिचे सातबारा पत्रकी नाव नोंद करून दाखला देण्यासाठी खासगी व्यक्ती रणजीत पाटील याने मंडल अधिकारी अभिजीत पवार यांच्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. पवार याने रणजीत पाटील याच्याकडे तडजोडीची १५ हजार रुपये रक्कम देण्यास सांगितली. हे सर्व तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक आस्मा मुल्ला, प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील, बापूसाहेब साळुंखे यांनी केली.