कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर येथील जोतिबा रोड येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या रस्त्यावर खरमाती व मलब्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, परिसरातील दुकानांच्या समोरच खरमातीचे ढीग लावून ठेवल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा

जोतिबा रोडवरील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचे भाडे द्यावे लागते. संथगतीने सुरु असलेल्या खोदकामामुळे येथील व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे खरमाती त्वरित उचलून तेथे फेन्सिंग करावे अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली. एप्रिल महिन्यात होणाऱ्या रथोत्सवासाठी घाटी दरवाजा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे येथील गटारीचे काम त्यापूर्वी होणे गरजेचे असल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेश खांडके, अभिजित भोसले, समीर लतीफ, संजय केसरकर, अर्जुन गोसावी, मदन जाधव, शिरीष पाटील, सिद्धार्थ गवळी व इतर व्यापारी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur at ambabai temple devotees suffer due to slow work of sewerage aam aadmi party css