कोल्हापूर : अस्ताव्यस्त अतिक्रमणांमुळे काहींना जीव गमवावा लागल्यानंतर आता महापालिकेचे डोळे उघडले आहेत. इचलकरंजी शहरातील अतिक्रमणांवर गुरूवारी महापालिकेने पोलिस बंदोबस्तात मोहिम उघडत हातोडा घातला. मात्र ही मोहीम याही पुढे कठोरपणे आणि दबाव विरहित राबवली जावी अशी मागणी केली जात आहे.
इचलकरंजी शहराची वाढ होईल त्याप्रमाणे विविध प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत, भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ वस्तू विक्रेते यांची लांबलचक रांग पाहायला मिळते. तर मुख्य चौकांमध्ये खाऊच्या गाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या अतिक्रमणांना रोखणारी यंत्रणा इचलकरंजी महापालिकेकडे आहे कि नाही असे वाटण्यासारखी बेबंदशाही दिसत होती. याच अतिक्रमणांमुळे अलीकडे काहींना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
हेही वाचा : कोल्हापूर: राधानगरी धरणात पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू
या विरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर आज आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विविध पथकांनी सकाळपासून थेट रस्त्यावर उतरून कारवाई केली. महात्मा गांधी पुतळा चौक ते कॉ.मलाबादे चौक, नारायण पेठ, सुंदर बाग, राजर्षी शाहू पुतळा, शिवतीर्थ परिसर, डेक्कन रोड, स्टेशन रोड यासह मुख्य बाजारापेठेतील अतिक्रमणे हटवण्यात आली. बंद अवस्थेत असलेले तसेच रस्त्यात असलेले हातगाडे जप्त करण्यात आले.
उपायुक्त केतन गुजर, नगररचनाकार नितीन देसाई, विद्युत विभागाचे संदीप जाधव, हरिष पाटील, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कॉ.मलाबादे चौकापासून अतिक्रमणे हटवण्यास सुरूवात केली तर नगररचनाकार प्रशांत भोसले, लकडे, प्र.सहायक उपायुक्त दिपक खोत, सामान्य प्रशासन अधिकारी प्रियंका बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली आणखीन एका पथकाने पोलिस बंदोबस्तात स्टेशन रोडवर कारवाई सुरू केली.
पोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळ विक्रेते यासह जीवनावश्यक वस्तू विक्री करणार्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. अनेक वर्षांपासून या मुख्य बाजारपेठेत ठाण मांडलेले हातगाडे, व्यापारी, सातत्याने वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढण्यात आली. नेहमीच अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील फळ विक्रेते, हातगाडे आदींवरही कारवाई करण्यात आली. काहींनी कारवाई सुरू होताच व्यंकटराव हायस्कूलच्या रस्त्याकडे साहित्यासह पळ काढला. त्यामुळे दिवसभर तरी रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
हेही वाचा : कोल्हापुरात पासिंगच्या दंडाविरोधात आपचे आंदोलन; दंडात्मक कारवाई थांबवा अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा
मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी दुकानांबाहेर लावलेले साईन बोर्ड व इतर फलकही हटवण्यात आले. लायकर गल्ली येथे डिजीटल फलक हटवताना विरोध झाल्याने काह काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा फलक काढून घेण्यात आला. शिवतीर्थ परिसरात गजरा विक्रेते तसेच तेथील हॉटेल खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे रस्त्यावर असलेले साहित्य, बोर्ड जप्त करण्यात आले. राजर्षी शाहू पुतळा परिसरातही अतिक्रमणे हटवण्यात आली. दुपारी डेक्कन परिसरात हातगाड्यांचे व इतर अतिक्रमणे हटवत रस्ते मोकळे करण्यात आले.