कोल्हापूर : लिखाण, पुस्तक यांची संख्या कमी होत असल्याची चर्चा असताना कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांनी वयाच्या नव्वदीत चक्क शंभरावे पुस्तक लिहून हातावेगळे केले आहे. त्यांच्या या कामगिरीनिमित्त साहित्य निर्मिती शताब्दी सोहळा रविवारी, २६ मे रोजी येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, कवी अशोक नायगावकर, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सदस्य ज्ञानेश्वर मुळे, कोमसाचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, जिल्हाधिकारी अमोल हेडगे उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आहेत, अशी माहिती प्रकाशन सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. भेडसगाव (ता. शाहूवाडी ) या छोट्या गावात जन्मलेले नलगे वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर आहेत. घरात कोणीही शिकलेले नसताना त्यांनी शिक्षणाची कास धरली. नववीत असताना त्यांनी लिहलेल्या ‘ गळफास ‘ या एकांकिकेला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांनंतर त्याचे पुस्तके प्रकाशित झाले.
हेही वाचा : दिलशाद मुजावर यांना ‘अरुणोदय ‘ पुरस्कार मरणोत्तर जाहीर
नलगे यांनी १४ साहित्य प्रकारात मुशाफिरी चालू ठेवली. शैक्षणिक, सामाजिक, चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले. आता त्यांचे ‘उंबरठा’ हे शंभरावे पुस्तक वाचकांसमोर येत आहेत. रविवारच्या पुरवण्याचे संपादन त्यांनी वर्षांनुवर्ष केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नलगे यांच्या सात व इतर तीन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील, कार्यवाह डॉ. रूपा शहा, युवराज कदम, अनिता नलगे, मारुती फाळके आदी उपस्थित होते.