कोल्हापूर : आगामी काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व तरुणांकडे जाईल. अशावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील हे पुढील काळात काँग्रेसचे मोठे नेते असतील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांचे वर्चस्व राहिले आहे, तरुण नेतृत्वाला संधी कितपत राहणार या प्रश्नावर बोलताना आमदार थोरात म्हणाले, युवकांनी नेतृत्वाने पुढे येऊन काँग्रेसचे काम सांभाळले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. अशावेळी सतेज पाटील यांना मोठी संधी आहे. त्यांनाच पुढे सर्व काही सांभाळायचे आहे. महाराष्ट्र सांभाळू शकतील असे त्यांचे नेतृत्व आहे, अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
मराठा आरक्षण निवडणुकीसाठी
मराठा आरक्षणाबाबतचे अधिवेशन अचानक बोलवले गेले. त्याआधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे अपेक्षित होती, पण ती घेतली गेली नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काही गोष्टींचा खुलासा करण्याची मागणी केली होती. यापूर्वी दोन वेळा आरक्षण देण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. ते का झाले नाहीत हे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अपेक्षित होते. पण त्याचा समाधानकारक खुलासा झालेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का? अशी शंका वाटते. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही काँग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : कोल्हापूर : आग लागून मोटार बेचिराख; इचलकरंजी जवळील प्रकार
ही भाजपची फसवी निती
कधी मी तर कधी विजय वड्डेटीवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा खोट्या बातम्या पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे ही भाजपची नीती आहे. याला निरोगी राजकारण म्हणता येणार नाही. भाजपचे हे राजकारण तत्व, विचारांच्या पलीकडे आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
हेही वाचा : भाजपला पराभूत करण्यासाठी भाकप इंडिया आघाडी – राष्ट्रीय महासचिव डी. राजा
नेते गेले; लोक काँग्रेसकडे
ते म्हणाले, काँग्रेस पक्षातून कोणी बाहेर गेल्यामुळे त्याचा पक्षावर फार मोठा परिणाम होतो असे नाही. स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून भाजप ज्या पद्धतीने राजकारण करत आहे ते लोकांना आवडलेले नाही. नेते गेले तरी लोकमानस आमच्या सोबत आहे आणि ते निवडणुकीत दिसून येईल, असा दावा थोरात यांनी केला.