कोल्हापूर : केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार ट्रकचालकास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याला विरोध करीत कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक, टँकरचालकांनी सोमवारी संप सुरू केला आहे. सुमारे दोन हजारांवर ट्रक राष्ट्रीय महामार्ग, परराज्यांत अडकून पडले आहेत. तर, यामुळे सुमारे ४० कोटी रुपये भाडे वाहतूक उलाढाल ठप्प झाली असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन प्रस्तावित कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
अपघाताच्या वाढत्या घटनांबाबत केंद्र शासनाने कठोर उपाय योजना करण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत वाहन चालकांना दहा वर्षांचा कारावास व सात लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे. सध्या मालवाहतूक व्यवसायात २७ टक्के चालक कमी आहेत. असा अतिकडक कायदा केल्याने नव्याने कोणी चालक तयार होणार नाहीत, अशी भीती चालक व्यक्त करत आहेत. त्यातून या कायद्याला विरोध करण्यासाठी आज वाहन चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड तसेच राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतुकीच्या गाड्या रांगेने उभ्या आहेत.
हेही वाचा : कोल्हापूरच्या हद्दवाढीचे राजकारण तापले
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव , उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात प्रमुखांना निवेदन देण्यात आले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन विभाग आहे. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून ते या प्रश्नाबाबत विचार करत आहेत. त्यांनी केंद्र शासनाकडे या विषयावर चर्चा करावी असा प्रयत्न केला जाईल”, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लॉरी असोसिएशनला दिले.