कोल्हापूर : कन्यासम मुलीच्या रुग्णालयाचे उद्घाटन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातेबंधाची जपणूक केली. यामुळे भारावलेल्या डॉ. नूपुर पाटील यांनी नितीन काकांनी शब्द पाळला, अशा भावना व्यक्त केल्या. भारतीय राजकीय पटलावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणापलीकडले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. व्यस्त दिनक्रमातही त्यांनी अनेक कुटुंबांशी जोडलेले ऋणानुबंध ते मंत्री झाले तरी मनमुराद जपण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच प्रत्यय कोल्हापुरात आला आहे.

नागपूरचे खळतकर कुटुंब आणि गडकरी यांच्यातील जिव्हाळा गेली ४५ वर्ष कायम आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना खळतकर कुटुंबातील डॉ. नूपुर यांना मंत्री गडकरी यांनी तुझ्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला नक्की येईन, असा शब्द दिला होता. नूपुर व डॉ. राहुल पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत तो त्यांनी पूर्ण केला.

नेत्यांची मांदियाळी

मंत्री गडकरी यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शाहू छत्रपती, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विशाल पाटील आदी खासदार, संजय मंडलिक, अमल महाडिक, जयंत आसगांवकर आदी आमदार उपस्थित होते.