कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळला आहे. नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढ करण्याचे आश्वासन दिले होते . मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते आश्वासन देत आहेत. मात्र याबाबत पूर्तता होत नाही. त्यामुळे त्यांच्या २६ जून रोजीच्या कोल्हापूर कार्यक्रमावेळी जिल्हा बंदी करण्याचा आणि काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत उद्या हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती समन्वयक एडवोकेट बाबा इंदुलकर, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्ट यांनी शनिवारी दिली.
त्यांनी सांगितले की, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न दीर्घ काळापासून रेंगाळला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री हद्दवाढीसाठी प्रयत्नशील आहे. हद्दवाढीला ग्रामीण भागाचा विरोध आहे; तो दूर करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.मात्र पालकमंत्री बदलल्यानंतर ते कोल्हापुरातून गायब झाले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात एका झेंडावंदन कार्यक्रमानंतर हद्दवाढ करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री ही अनेक वेळा कोल्हापूरला आले. त्यांनीही याबाबत आश्वासित केले आहे.
हेही वाचा : कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशालच पाहिजे; शिवसैनिकांचा आग्रह
मात्र कोल्हापूरच्या हद्दवाढीची पूर्तता होत नाही. त्यामुळे कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत. आता राज्य शासनाच्या वतीने कोल्हापुरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत . त्यांनी येताना कोल्हापूर हद्दवाढीचा आदेश घेऊन यावा. अन्यथा त्यांना कोल्हापूर जिल्हा बंदी घालण्यात येईल. काळे झेंडे दाखवण्यात येतील. याबाबत उद्या रविवारी एका व्यापक बैठकीचे आयोजन केले असून त्यामध्ये याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.